जनसंघर्षापूर्वी पक्षांतर्गत संघर्षाशी सामना

Politics
Politics

निवडणुका जवळ आल्या, की लोकप्रतिनिधींचे मतदारसंघातील दौरे वाढतात. विकासकामांचे नारळ फुटतात. नेते कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध होऊ लागतात आणि राजकीय पक्षांच्या विविध यात्रा, आंदोलने सुरू होतात. एकूणच लोकसभा निवडणुकीचा ‘हंगाम’ आता येऊ घातला आहे. त्यामुळे या सर्व हालचाली आता पुण्यासह महाराष्ट्रात घडू लागल्या आहेत. राजकीय घडामोडींचे महत्त्वाचे केंद्र असणाऱ्या पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दीड वर्षानंतर हजेरी लावून नुकताच कार्यकर्त्यांना ‘सुखद’ धक्का दिला. अपवादानेच काँग्रेस भवनला फिरकणाऱ्या नेते-कार्यकर्त्यांची या दिवशी तेथे गर्दी जाणवली. चव्हाण यांनी पश्‍चिम महाराष्ट्रात ३१ ऑगस्टपासून ‘जनसंघर्ष’ यात्रा काढणार, असे जाहीर केले खरे; पण त्यांना पक्षांतर्गत संघर्षाचाच पहिल्यांदा सामना करावा लागला. जुन्या नेत्यांनी एकमेकांविरोधात वाद घालून ‘सत्ता गेली तरी पीळ मात्र कायम’ असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे सरकारविरोधात जनसंघर्ष उभारताना आधी पक्षांतर्गत संघर्षावर काँग्रेसला तोडगा काढावा लागणार, हे नक्की!

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर हल्लाबोल आंदोलन केले. या आंदोलनात शेतकरी, छोटे व्यापारी, व्यावसायिक, बेरोजगार यांच्यापर्यंत पोचून राज्यातील व केंद्रातील भाजप सरकारविरोधात चांगलीच हवा तापविण्यात आली. पश्‍चिम महाराष्ट्रात नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीच्या या आंदोलनास प्रतिसाद मिळाला. मात्र, नागरिकांमधील नाराजी मतपेटीपर्यंत पोचली नसल्याचे जळगाव आणि सांगली महापालिका निवडणुकांवरून स्पष्ट झाले.

या पार्श्‍वभूमीवर आता काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा होत आहे. यात्रा होत असलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांत भाजपने गेल्या साडेचार वर्षांत बऱ्यापैकी पाय पसरले आहेत. पूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना फोडून त्यांना ताकद दिली आहे.

त्यामुळे ज्या भागात ‘कमळ’ कधीही फुलले नव्हते, तेथे भाजपचा विस्तार झाला आहे. खरे तर पश्‍चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला. त्यावर प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने आणि नंतर भाजपने अतिक्रमण केले. मात्र, या भागात काँग्रेसला मानणारा कार्यकर्ता आजही मोठ्या संख्येने आहे. त्यास कशी चालना मिळणार, हा खरा प्रश्‍न आहे. यात्रा हा केवळ एक ‘इव्हेंट’ होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. 

पुण्याच्या दृष्टीने विचार केल्यास स्थानिक नेत्यांमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी पक्षश्रेष्ठींना कष्ट घ्यावे लागणार आहेत. अद्यापही ‘माजी खासदार सुरेश कलमाडी यांना पक्षप्रवेश द्या’ अशी मागणी करणारे आणि तसे पत्र पक्षाध्यक्षांना लिहिणारे नेते नव्या कार्यकर्त्यांशी नाळ कशी जुळवून घेणार, हाही प्रश्‍न आहे. पुण्यात काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविण्यास पक्षाबाहेरील लोकच जास्त इच्छुक आहेत. निवडणुकीच्या राजकारणात ‘विजय’ हेच सत्य मानले जाते. तसाच संदेश अशोक चव्हाण यांनी दिला. निवडून येण्याची क्षमता हीच उमेदवाराची पात्रता असेल, असे सांगून त्यांनी खासदार संजय काकडे, माजी आमदार विनायक निम्हण यांच्या आशाही पल्लवित ठेवल्या; पण काँग्रेसला गांभीर्याने पुण्यातील जागा जिंकायची असेल, तर जनसंघर्षाआधी पक्षांतर्गत संघर्ष टाळण्यास प्राधान्य द्यावे लागेल, तरच ‘जन’ तुमचा संदेश ऐकण्याची तयारी ठेवतील, हे खरे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com