लोणावळ्यात पावसाचा जोर वाढला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

लोणावळा - मोसमी पावसाने जोर धरल्याने लोणावळा परिसरात लोणावळा, खंडाळा वर्षाविहारासाठी पर्यटकांनी फुलले आहे. मात्र पहिल्याच वीकेंडला पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने रविवारी (ता. 25) वाहतूक कोंडीसह पर्यटकांचीही कोंडी झाली. 

लोणावळा - मोसमी पावसाने जोर धरल्याने लोणावळा परिसरात लोणावळा, खंडाळा वर्षाविहारासाठी पर्यटकांनी फुलले आहे. मात्र पहिल्याच वीकेंडला पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने रविवारी (ता. 25) वाहतूक कोंडीसह पर्यटकांचीही कोंडी झाली. 

पुणे-मुंबई महामार्गासह भुशी धरण, ऍम्बी व्हॅलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतुकीची कोंडी झाल्याने पर्यटकांसह नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागला. मावळातील दुर्गम भागातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी; तसेच वर्षाविहारासाठी लोणावळा परिसरास पर्यटकांची कायम पसंती असते. नुकत्याच झालेल्या बिगरमोसमी पावसाने लोणावळा व खंडाळा परिसरातील निसर्गसौंदर्य बहरले आहे. शनिवार, रविवार व रमजान ईदनिमित्त जोडून आलेल्या सुट्यांच्या पार्श्‍वभूमीवर लोणावळा व खंडाळा परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. पर्यटकांनी शनिवारी मोठी गर्दी केल्याने लोणावळ्यातील वाहतुकीवर मोठा ताण आला होता. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या. येथील सहारा पूल, भुशी धरण, लायन्स पॉइंट, राजमाची उद्यान परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती. लोहगड, कार्ला, भाजे येथेही पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतूकव्यवस्था कोलमडली. द्रुतगती मार्गावरील वाहतूक खंडाळा घाटात संथगतीने सुरू होती. पुणे-मुंबई महामार्गावरील महावीर चौक, गवळी वाडा, किरण पंपापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, मावळा पुतळा, रायवूड, जुना खंडाळा येथेही वाहतूक कोंडी झाली. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना कसरत करावी लागली. 

लोणावळ्यात 150 मिलिमीटर पावसाची नोंद 
लोणावळा परिसरात मॉन्सून चांगलाच सक्रिय झाला असून, रविवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत 150 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रविवारीही दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. लोणावळ्यात एकूण 524 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या वर्षी आजअखेर 1066 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. ओढे-नाले, धबधबे खळाळून वाहू लागले असून, इंद्रायणी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. 

Web Title: lonaval news rain