चुरशीच्या लढतीत शिवसेनेवर मात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

भाजप-रिपाइं युतीला ९, तर शिवसेना-काँग्रेसला प्रत्येकी सहा जागा

भाजप-रिपाइं युतीला ९, तर शिवसेना-काँग्रेसला प्रत्येकी सहा जागा
लोणावळा - पर्यटननगरी असा लौकिक असलेल्या लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सुरेखा नंदकुमार जाधव या विराजमान झाल्या आहे. अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या लढतीत सुरेखा जाधव यांनी शिवसेनेच्या उमेदवार शादान चौधरी यांचा १ हजार ६३१ मतांनी पराभव करत विजय मिळविला. लोणावळ्यात भाजप व आरपीआय (आठवले गट) युती सर्वांत मोठा पक्ष ठरला असून युतीचे ९ नगरसेवक निवडून आले आहे. शिवसेना व काँग्रेसला प्रत्येकी ६ मिळाल्या असून अपक्षांनी ४ जागांवर बाजी मारली आहे. यामध्ये गवळीवाडा प्रभागातून काँग्रेसच्या सुवर्णा अकोलकर या सर्वाधिक १२५८ मतांनी विजय मिळवला असून तुंगार्ली प्रभागातून नागरिकांच्या मागास प्रवर्गातून निवडणूक लढवीत असलेले राजू बच्चे यांनी सलग तिसऱ्यांदा विजयश्री खेचून आणत ११३० मतांनी बाजी मारली. भांगरवाडी प्रभाग क्र. पाचमधील लढत सर्वाधिक चुरशीची झाली. भाजपचे देविदास कडू यांनी माजी नगरसेवक दत्तात्रेय येवले यांचा अवघ्या चार मतांनी पराभव केला. तर विद्यमान नगरसेवक सुनील इंगुळकर यांनी भाजपचे विजय मोरे यांचा १८९ मतांनी पराभव केला.

खंडाळ्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातून भाजपच्या माजी नगरसेविका रचना सिनकर यांनी शिवसेनेचे अशोक गवारणे यांच्यावर एकतर्फी विजय मिळवला. नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी बुधवारी (ता. १४) शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली होती. गुरुवारी (ता. १५) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास येथील रेल्वे इन्स्टिट्यूट येथे मतमोजणीस सुरवात झाली. मुख्य निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी मतमोजणी केंद्रास भेट देत प्रक्रियेची पाहणी केली. लोणावळ्याचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होते. नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात होत्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शालिनी अमित गवळी यांनी ६ हजार ४३०, काँग्रेसच्या ५ हजार ९५९ मते मिळाली. मतदारांनी त्याखालोखाल नोटाचा पर्याय स्वीकारत ४६६ मते दिली. बसपाच्या संध्या भोसेकर यांना ३९५, तर अपक्ष वैशाली पोटफोडे यांना ३९६ मते मिळाली.

Web Title: lonavala nagar parishad election result