एकवीरा आईची कार्ल्यात उद्यापासून यात्रा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

यात्रा काळात एकवीरा गडावर भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन भाविकांच्या सोयीसाठी प्राधान्य देण्यात येत आहे. भाविकांच्या संख्येमुळे वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबर भाविकांना माहिती दर्शक फलक लावणे, पिण्याचे पाणी, दर्शनबारीची सोय करण्यात आली आहे.
- अनंत तरे, अध्यक्ष, एकवीरा देवस्थान

लोणावळा - महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान व कोकणी, कोळी बांधवांचे कुलदैवत असलेल्या वेहेरगाव, कार्ला येथील श्री एकवीरा देवी यात्रेस शुक्रवार (ता. २३) पासून सुरवात होत आहे. यात्रा विनासायास पार पडावी, या साठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत असली, तरी एकवीरा देवस्थानातील वादाचे सावट यात्रेवर असणार आहे. 

वेहेरगाव, कार्ला येथील डोंगरावर वसलेली एकवीरा देवीची यात्रा राज्यभर प्रसिद्ध आहे. विशेषतः कोकणातील असंख्य कोळी तसेच आगरी बांधवांची एकवीरा देवीवर मोठी श्रद्धा आहे. वार्षिक पालखी सोहळा ही भाविकांसाठी एक मोठी पर्वणी असते. चैत्र शुद्ध षष्ठीस श्री एकवीरा देवीचे माहेर मानले जाणाऱ्या देवघर येथून देवीचा भाऊ काळभैरव देवाची पालखी एकवीरेच्या गडावर येते. येथूनच खऱ्या अर्थाने यात्रेस सुरवात होते. चैत्र शुद्ध सप्तमीचा दिवस हा मुख्य यात्रेचा दिवस असून या दिवशी देवीचा पालखी सोहळा हा यात्रेतील प्रमुख सोहळा मानला जातो. देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे यांच्या हस्ते देवीस अभिषेक करून प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. चैत्र शुद्ध अष्टमीस यात्रेचा समारोप होत असून, पहाटे देवीस चौल आग्रावचे आग्रावकर व पेणचे वासकर यांच्या हस्ते मान व तेलवणाचा कार्यक्रम होणार आहे. ग्रामीण पोलिसांच्या वतीने भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पायथ्याशी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा काळात कार्ला परिसरात दोन दिवस प्रशासनाने दारूबंदी केली आहे.

असा असेल कार्यक्रम
शुक्रवारी (ता.२३) - देवघर येथून काळभैरव देवाच्या पालखीचे प्रस्थान
शनिवारी (ता.२४) - गडावर आई एकवीरा देवीचा पालखी सोहळा
रविवारी (ता. २५) - देवीस मान व तेलवणाचा कार्यक्रम

Web Title: lonavala news ekvira devi yatra