‘सहारा’ने केले स्थानिकांना ‘बेसहारा’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

लोणावळा - सहाराचे ॲम्बी व्हॅली सिटी प्रकल्प अवसायनात निघाल्याने १९ ऑक्‍टोबरनंतर बंद होणार आहे. त्यामुळे सहाराचे कर्मचारी ‘बेसहारा’ होणार आहेत. अडीच हजार कर्मचाऱ्यांपैकी सोळाशे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याची नोटीस कंपनीने बजावली आहे. ॲम्बी व्हॅलीच्या सभोवताली असलेल्या गावांतील ९२४ स्थानिकांवर या निर्णयामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असून, अनेकांची दिवाळी अंधारात जाणार आहे. या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. ४) ॲम्बी व्हॅली कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे धरत तीव्र संताप व्यक्त केला.

लोणावळा - सहाराचे ॲम्बी व्हॅली सिटी प्रकल्प अवसायनात निघाल्याने १९ ऑक्‍टोबरनंतर बंद होणार आहे. त्यामुळे सहाराचे कर्मचारी ‘बेसहारा’ होणार आहेत. अडीच हजार कर्मचाऱ्यांपैकी सोळाशे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याची नोटीस कंपनीने बजावली आहे. ॲम्बी व्हॅलीच्या सभोवताली असलेल्या गावांतील ९२४ स्थानिकांवर या निर्णयामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असून, अनेकांची दिवाळी अंधारात जाणार आहे. या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. ४) ॲम्बी व्हॅली कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे धरत तीव्र संताप व्यक्त केला. कंपनीचा हा निर्णय अन्यायकारक असून त्या विरोधात कामगार कल्याण विभाग व न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली. कंपनीजवळ पोलिस बंदोबस्त तैनात होता. 

ॲम्बी व्हॅलीचा खर्च भागविणे अवघड जात असल्याने सहाराच्या संचालक मंडळाने हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रशासकीय कर्मचारी वगळता अन्य सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना घरी बसविण्यात आले आहे. अन्य कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासंदर्भातही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या कर्मचाऱ्यांना पंधरा दिवसांचा पगार देण्यात येणार असून, त्यानंतर कामावर न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कंत्राटी कामगारांसह कायम कर्मचाऱ्यांचाही त्यात समावेश आहे. गेली अनेक वर्षे ॲम्बी व्हॅली कंपनीने सेवा दिल्यानंतर आता जायचे कुठे? असा प्रश्‍न कर्मचाऱ्यांनी या वेळी व्यक्त केला. कंपनीच्या या निर्णया विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया नीलेश मेंगडे यांनी दिली. काही कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले आहे. मात्र, पंधरा दिवसांनंतर पुढे काय? असा प्रश्‍न उभा राहत आहे. कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांचे वेतन थकले असून, थकीत वेतनासह कर्मचाऱ्यांना त्यांचे लाभ मिळाले पाहिजेत, असे मेंगडे यांनी सांगितले.

Web Title: lonavala pune news sahara city issue