नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा सज्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

लोणावळा - सरत्या वर्षास निरोप देण्यासाठी तसेच जुन्या वर्षातील कटू आठवणी विसरत नव्या वर्षाच्या स्वागतास लोणावळेकर सज्ज झाले आहेत. 

लोणावळा - सरत्या वर्षास निरोप देण्यासाठी तसेच जुन्या वर्षातील कटू आठवणी विसरत नव्या वर्षाच्या स्वागतास लोणावळेकर सज्ज झाले आहेत. 

नूतन वर्षानिमित्त मौजमजा करण्यासाठी; तसेच येथील प्रसिद्ध चिक्कीचा आस्वाद घेण्यासाठी लोणावळ्यात पुणे, मुंबईसह परराज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यादरम्यान सेकंड होमबरोबरच बहुतांशी हॉटेल्स; तसेच खासगी बंगल्यांमध्ये त्यांचे वास्तव्य असते. सध्या नाताळ सणाच्या सुट्यांमुळे लोणावळा व खंडाळा परिसरात गर्दी होत आहे. त्यामुळे दुकाने व बाजारपेठा गजबजल्या आहेत. लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की, फरसाण तसेच फज खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होत आहे. सोमवारी ३१ डिसेंबर असल्याने वीकएंडला शनिवारी व रविवारी पर्यटकांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे. 

दक्षता घेण्याची गरज
सरत्या वर्षास निरोप देताना तसेच नववर्षाचा जल्लोष करताना खबरदारी बाळगावी लागणार आहे. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर; तसेच दारू पिणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्याने पर्यटकांना दक्षता घ्यावी लागणार आहे. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, यासाठी नागरिकांनी अधिक सजग राहून संशयास्पद बाबी पोलिसांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.

पोलिस दलाच्या वतीने संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारी घेत शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी आनंद लुटावा. मात्र, शहराच्या शांततेसाठी सहकार्य करावे.
- बी. आर. पाटील, पोलिस निरीक्षक

पोलिस दलाचे आवाहन
 आस्थापनांना आवश्‍यक ते कायदेशीर तात्पुरते परवाने घ्यावेत. 
 लाउडस्पीकर परवानगी रात्री बारा वाजेपर्यंतच
 हॉटेलमध्ये येणाऱ्यांची तपासणी करताना मेटल डिटेक्‍टरचा वापर करावा
 सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना स्पीकर, डेक, डीजे वाजविल्यास कारवाई
 हॉटेलमालकांनी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी
 दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई 
 संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तूंची माहिती पोलिसांना द्यावी 

Web Title: Lonawala Ready for New year Welcome