आणखी २ पोलिस ठाणे पुणे शहर आयुक्तालयाला जोडली जाणार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 January 2021

वाघोलीचा महापालिकेतील समावेश, पुणे नगर महामार्ग आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील वाढती वाहतूक समस्या, गुन्हेगारीचे प्रमाण पाहता अधिक सुविधा मिळविण्यासाठी शहर आयुक्तालयात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वाघोली (पुणे) : पुण्यात सहा नवीन पोलीस ठाणे अस्तित्वात येणार आहेत. शहराची वाढणारी हद्द, गुन्हेगारीचे प्रमाण आणि वाहतुकीची समस्या लक्षात घेता लोणीकंद आणि लोणी काळभोर ही पोलिस ठाणे शहर आयुक्तालयात समावेश करण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. यामुळे शहर पोलिस ठाण्यांची संख्या 35 होणार आहे. आमदार अशोक पवार यांनी ही माहिती दिली.

पुणे ग्रामीणमधील लोणीकंद पोलीस ठाण्याचे विभाजन करून वाघोली, लोणीकाळभोरचे विभाजन करून उरुळी कांचन, हवेलीचे विभाजन करून नांदेड सिटी, तर शहर आयुक्तालयातील हडपसरचे विभाजन करून काळेपडळ, चंदननगरचे विभाजन करून खराडी पोलिस ठाणे तर चतुःशंगीचे विभाजन करून बाणेर पोलिस ठाणे अस्तित्वात येणार आहेत.

Video: 'हाफ चड्डी घालून नागपूरात खोटी भाषणं करणं हा राष्ट्रवाद नाही'; सचिन पायलट यांनी डागली तोफ

यामधील लोणी काळभोर आणि लोणीकंद ही पोलीस ठाणी पुणे ग्रामीणमधेच ठेवण्यात येणार होती. मात्र सोमवारी (ता.४) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत लोणीकंद आणि लोणी काळभोर ही पोलिस ठाणी ही शहर आयुक्तालयात जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ही दोन्ही पोलिस ठाणी पुणे ग्रामीणमध्येच राहावीत, अशी मागणी आमदार अशोक पवार यासह या परिसरातील लोकप्रतिनिधींची होती. मात्र आजच्या बैठकीत यावर सखोल विचारविनिमय झाला.

वाघोलीचा महापालिकेतील समावेश, पुणे नगर महामार्ग आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील वाढती वाहतूक समस्या, गुन्हेगारीचे प्रमाण पाहता अधिक सुविधा मिळविण्यासाठी शहर आयुक्तालयात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी आमदार अशोक पवार, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यासह पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हुंड्यासाठी सासरचे करायचे छळ; जीवनाला कंटाळून विवाहितेनं घेतला गळफास​

लोणी काळभोर व लोणीकंद ही दोन्ही पोलीस ठाणी पुणे ग्रामीण मधेच राहावी अशी आमची मागणी होती. मात्र या विषयावर आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. भविष्याचा विचार करता गुन्हेगारी आणि दोन्ही महामार्गावरील वाहतूक समस्या लक्षात घेता शहर आयुक्तालयात समाविष्ट झाल्यास अधिक सुविधा आणि कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या असेल. यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील. यासाठीच ही दोन्ही पोलीस ठाणी शहर आयुक्तालयात घेण्याचा निर्णय घेतला.
- अशोक पवार, आमदार

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loni kand and Loni Kalbhor police stations will be included in Pune City Commissionerate of Police