Video: 'हाफ चड्डी घालून नागपूरात खोटी भाषणं करणं हा राष्ट्रवाद नाही'; सचिन पायलट यांनी डागली तोफ

टीम ई-सकाळ
Monday, 4 January 2021

पायलट यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचा विरोध केला. भाजप नव्या कृषी कायद्यांद्वारे शेतकऱ्यांना अंधारात ढकलत आहे, अशी टीका करत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध केला.

जयपूर : काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे. 'हाफ चड्डी घालून नागपूरात खोटी भाषणं करणं म्हणजे राष्ट्रवाद नाही,' असं पायलट यांनी म्हटलं आहे. रविवारी (ता.४) जयपूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. 

पायलट म्हणाले, 'तुम्ही लव्ह-जिहादसाठी कायदे बनवले. लग्नासारख्या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि कायदे करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे, पण शेतकऱ्यांच्या भविष्याबाबत विचार करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. देशातील बहुतेक शेतकरी नेते हे काँग्रेस पक्षाचे होते. काही इतर पक्षाचे होते. पण भाजपमध्ये एकही शेतकरी नेता नाही आणि होऊही शकणार नाही. सध्या शेतकरी आंदोलन करत नाही, त्यांच्या मनात भीती आहे. आणि मुलांच्या भविष्याची चिंताही आहे.'

'स्टॅलिन यांना CM होऊ देणार नाही'; तमिळनाडूत भावात-भावात संघर्ष पेटला​

पायलट यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचा विरोध केला. भाजप नव्या कृषी कायद्यांद्वारे शेतकऱ्यांना अंधारात ढकलत आहे, अशी टीका करत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध केला. यासोबतच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत नाव न घेता रा.स्व.संघाला टोला लगावला. 

दरम्यान, गेल्या ४० दिवसांपासून हजारोंच्या संख्येत शेतकरी आणि संघटना दिल्ली बॉर्डरवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत सहा वेळा चर्चा झाली असली तरी या सर्व बैठका निष्फळ ठरल्या आहेत. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, दुसरीकडे केंद्र सरकारही आपले पाउल मागे घेण्यास तयार नाही. आज दिल्लीत पुन्हा एकदा म्हणजे सातव्यांदा शेतकरी संघटनांचे नेते आणि केंद्र सरकारमध्ये बैठक होणार आहे. 

लशीवरुन राजकारणः काँग्रेस नेते म्हणाले, आधी PM मोदी आणि भाजप नेत्यांनी लस घ्यावी​

यापूर्वी झालेल्या बैठकांमधून कोणताही तोडगा निघाला नाही. फक्त दोन मुद्द्यांवर सहमती झाली. वीज अधिनियम दुरुस्ती कायद्यात बदल केले जाणार आहेत. त्यानुसार, वीज वापरावर शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे अनुदान मिळणार आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण अध्यादेशातही दुरुस्ती करण्यात येणार आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Sachin Pilot criticized nationalism of BJP and RSS