सीताफळांची परदेश वारी यंदा खडतर 

custard apple
custard apple

सासवड (पुणे) : राज्यातील सीताफळास देशभरात मोठी बाजारपेठ आहे. मात्र, यंदा राज्यातून परप्रांताकडे सीताफळ वाहतुकीसाठी रेल्वे बंदच आहे. तर, विमानसेवेने होणारी माल वाहतूक भाडेवाढीने सीताफळासाठी परवडतच नाही. त्यामुळे चार टनी क्षमतेची छोटा टेंपो महत्त्वाच्या बाजारपेठेत पाठविण्याचा प्रकार सुरू आहे. भाडेवाढीने हवाईमार्गे वाहतूक अर्धा टक्काही नाही. त्यामुळे परदेशी निर्यातही यंदा झाली नाही.  

कोरोना संसर्गातून लॉकडाउन झाला होता. अनलॉक प्रक्रिया सुरू झाली, तरी अपेक्षित वाहतूक व्यवस्था सुरळीत न झाल्याची खंत सासवडच्या घाऊक बाजारातील अनेक सीताफळ व्यापाऱ्यांनी मांडली. त्यातून सीताफळाचे बाजारभाव सतत पडतायेत. पूर्वी 1,500 ते 2,200 रुपयांना जाणारे 20 किलोचे क्रेट यंदा कधी तरी 800-900 रुपयाला, तर बरेचदा 200 ते 600 रुपयेच भाव येथे घाऊक बाजारात आहे. त्यामुळे हंगामात माल असूनही पुरंदरच्या पाच हजार हेक्‍टरवरील या पिकास हंगामाच्या पहिल्या दीड महिन्यातच मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

परदेशी निर्यातही यंदा नाही आणि भाडेवाढीने हवाईमार्गे वाहतूक अर्धा टक्काही नाही. देशभरात पुरंदरमधून माल पाठविणारे सुमारे शंभरहून अधिक व्यापारी होते. आता म्हस्कू खेडेकर, गिरीश काळे, संपत खेडेकर, बाळासाहेब कुंजीर, सागर काळे, तुषार झेंडे आदी 12 ते 15 जण स्थानिक व्यापारी व बाहेरचे व्यापारी 15 ते 17 माल घेतात. व्यापारी संख्या घटल्यामुळे भाव पडत आहेत. 150 ते 200 रुपये किलोचा दर राज्याबाहेर होता. मात्र, तिथला दर किलोमागे 70 ते 120 रुपये खाली आला. मग वाहतूक व पॅकिंग खर्च 60 ते 65 रुपये किलोमागे झाल्यावरही परराज्यातील माल पाठवणी नावालाच राहिली आहे, असे राज्य सीताफळ उत्पादक संघाचे संचालक माउली मेमाणे यांनी सांगितले.   

भूगी प्रकाराचा माल उकिरड्यावर 
हॉटेल, शीतपेय, आइस्क्रीम, रबडी आदींसाठी सीताफळ पल्प (गर) काढणी आता हंगामात जोमात असायची. यंदा ही पुढची विक्री साखळीच बंद पडल्याने सीताफळ प्रक्रिया बंद झाली. त्यामुळे क्रमांक तीन व चार प्रतीचा माल प्रक्रियेला जायचा. त्याला मागणीच नाही. हा भूगी प्रकारातील माल एकूण उत्पादनात 25 ते 30 टक्के असतो. या भूगीला आठ ते पंधरा रुपये किलो मिळत होते. यंदा मात्र तो उकिरड्यावर जातोय, असे उत्पादक शंकर झेंडे, सनी खेडेकर, जितेंद्र कुंजीर, बाळासाहेब टिळेकर यांनी सांगितले.  

असे आहे वाहतुकीचे गणित 
- हवाई वाहतूक भाडे 22 रुपये होते, ते किलोमागे 42 रुपये किलो झाले 
- इथून विमानतळपर्यंत व तिकडच्या विमानतळापासून वाहतूक खर्च, पॅकिंग खर्च, मजुरी असा किलोमागे खर्च 62 रुपये 
- दिल्लीत क्रमांक एक प्रतीचे 120 रुपये किलो दराने व दोन नंबर प्रतीचे 70 रुपये दराने जाते 
- "पिकअप" प्रकारातील छोटी मालवाहतूक वाहने चेन्नईपर्यंत 41 हजार रुपये, बंगलोर 28 हजार, अहमदाबाद 16 हजार भाडे 
- एका पिकअपमध्ये चार टन सीताफळ 

हवाई वाहतुकीचा नाद न परवडल्याने सोडून दिला. रेल्वे माल वाहतूक सुरू असती, तर पुरंदरमधून खूप माल देशभरात गेला असता. आता केवळ व्यवहाराची परंपरा जपतोय व पिकअप वाहनाचाही खर्च जादा असल्याने मोजूनच माल पाठवितोय. 
- म्हस्कू खेडेकर, सीताफळ उत्पादक व देशांतर्गत व्यापारी, गुरोळी (ता. पुरंदर) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com