प्रेयसीचे लाड; प्रियकर गजाआड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पुणे - प्रेयसीची हौसमौज करण्यासाठी, तिला महागड्या भेटवस्तू, गाडी घेऊन देण्यासाठी कॅमेरामन प्रियकराने लग्नाच्या चित्रीकरणाच्या कामाचे कारण सांगून भाड्याने कॅमेरे घेतले. हे कॅमेरे अन्य लोकांकडे गहाण ठेवून प्रेयसीची हौस पुरविणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल २६ लाख ६० हजार रुपये किमतीचे दहा ‘फाइव्ह डी’ कॅमेरे आणि पाच लेन्स जप्त केल्या.

आकाश पांडुरंग भिसे (वय २२, मार्केट यार्ड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. केंजळे चौकात एका तरुणाकडे महागडा कॅमेरा असून, तो संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी विकास बोऱ्हाडे व शंकर कुंभार यांना खबऱ्यामार्फत मिळाली. पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, कर्मचारी बापूसाहेब खुटवड, केदार आढाव, शंकर कुंभार, सयाजी चव्हाण यांच्या पथकाने भिसे याला सापळा रचून पकडले.

भिसे याची काही महिन्यांपूर्वी एका तरुणीशी ओळख झाली होती. काही दिवस गाठीभेटी झाल्यानंतर त्यांचे प्रेम जुळले.  त्यानंतर प्रेयसीकडून विविध प्रकारची मागणी केली जात होती, मात्र भिसेकडे तेवढे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने लग्नाच्या चित्रीकरणाचे कारण सांगून अन्य छायाचित्रकारांकडून त्यांचे महागडे कॅमेरे भाड्याने घेण्याचा बनाव रचला. त्यासाठी दिवसाला दीड हजार ते १७०० रुपये भाडे देण्याचा त्याने बहाणा केला. त्यानंतर संबंधित कॅमेरे काही जणांकडे गहाण ठेवून पैसे घेतले. तेच पैसे प्रेयसीला दुचाकी, सोन्याचे दागिने व महागड्या हॉटेलिंगसाठी वापरले.

Web Title: Lover arrested in pune