प्रेमी युगालाच भांडण अन्‌ अपहरणाचा कॉल

संदीप घिसे
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पिंपरी - तो तिला कामावर सोडण्यासाठी जबरदस्तीने मोटारीत बसवत होता. ती मात्र प्रतिकार करीत होती. प्रेयसीच्या विरोधाला न जुमानता त्याने बळाचा वापर करीत तिला मोटारीत बसवून नेले. मात्र ही घटना पाहणाऱ्या एका दक्ष नागरिकाला त्या तरुणीचे अपहरण झाल्याचे वाटले. त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला मोटारीच्या क्रमांकासह माहिती दिली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नाकाबंदी लावली. पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतल्यावर सर्व घटनेचा उलगडा झाला आणि पोलिसांनी कपाळाला हात लावला.

चिंचवडला राहणारी ती हिंजवडीतील एका आयटी कंपनीत कामाला होती. तर तो शेअर मार्केटचे काम करीत आहे. ते दोघे विवाहित असून त्यांची फेसबुकवरून मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. गुरुवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ती तरुणी कामावर जाण्यासाठी निघाली. रस्त्यामध्ये तिला तिचा मित्र भेटला. त्याने तिला कंपनीत सोडतो, असे सांगितले. मात्र ती त्यास तयार नव्हती. अखेर त्याने आपल्या प्रेयसीला बळाचा वापर करीत मोटारीत बसविले. त्यांची ही झटापट एका नागरिकाने पाहिली. त्या तरुणीचे अपहरण झाल्याचा समज झाल्याने त्या नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षास याबाबत माहिती दिली.

तरुणीच्या अपहरणाची माहिती मिळताच पोलिस नियंत्रण कक्षाने खंडणी विरोधी पथक आणि शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना सतर्कतेचा आदेश दिला. ज्या मोटारीतून अपहरण झाले तिचा क्रमांक देऊन ठिकठिकाणी नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या. अखेर पोलिसांच्या सामूहिक प्रयत्नांना यश आले. संशयित मोटार वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिळून आली. मात्र मोटारीत अपहरण झालेली तरुणी नव्हती. पोलिसांनी मोटार चालकाला ताब्यात घेत खाक्‍या दाखविला आणि त्या तरुणीबाबत विचारणा केली. त्या तरुणाने तरुणीला हिंजवडी येथील कंपनीत कामावर सोडल्याचे सांगितले. पोलिसांनी कंपनीत जाऊन खात्री केली. त्यानंतर त्या दोघांनाही पोलिस ठाण्यात आणून जबाब घेतला. अपहरणाचा प्रकार नसल्याचे समजताच पोलिसांनी कपाळाला हात लावत सुटकेचा निःश्‍वास सोडला.

Web Title: Lovers Fighting Police Kidnapping Crime