काळे पडलेल्या सोयाबीनचे "मार्केट डाऊन'

soyabin
soyabin

अतिवृष्टीमुळे जुन्नरमधील शेतकऱ्यांना सुमारे 40 कोटींचा फटका

नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्‍यात सोयाबीन खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले आहेत. ऑक्‍टोबरमधील अतिवृष्टीमुळे सोयाबीन काळे पडले आहे. चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला प्रतिकिलो 35 ते 36 रुपयांदरम्यान भाव आहे. काळे पडलेल्या सोयाबीनला प्रतिकिलोस दहा ते वीस रुपयांदरम्यान भाव मिळत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादकांना सुमारे 40 कोटींचा फटका बसला आहे, अशी माहिती सोयाबीनचे व्यापारी शिवाजी कर्पे, अभय कोठारी यांनी दिली.


काही वर्षांपूर्वी तालुक्‍यात खरीप हंगामात सुमारे बारा हजार हेक्‍टर क्षेत्रात भुईमुगाची लागवड केली जात होती. अनियमित पावसामुळे भुईमुगाच्या उत्पादनात घट होत असल्याने शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत. या वर्षी सुमारे दहा हजार हेक्‍टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड केली होती. चांगला पाऊस झाल्याने पीक जोमात होते. बहुतेक शेतकऱ्यांनी ऑक्‍टोबरमध्ये सोयाबीनची काढणी सुरू केली. दरम्यानच्या काळात सुमारे पंधरा दिवस सतत पाऊस झाल्याने काढलेले व उभे पीक भिजले. काही भागांत शेंगांना मोड आले. सध्या सोयाबीन मळणीचे काम सुरू आहे. भिजल्यामुळे सोयाबीन काळे पडले असून एकरी एक ते दीड टन उत्पादन निघत आहे. गतवर्षाच्या तुलनेत उत्पादनात वाढ झाली. मात्र, पावसामुळे काळे पडलेले सोयाबीन मातीमोल झाले आहे. मागील वर्षी सोयाबीनचे एकरी उत्पन्न आठशे किलोच्या दरम्यान निघाले होते, तर भाव प्रतिकिलो अठ्ठावीस रुपये ते तीस रुपयांदरम्यान मिळाला होता. सोयाबीन काळे पडल्याने या वर्षी प्रतिकिलो पंधरा ते पंचवीस रुपयांदरम्यान तोटा झाला आहे.
 

एकरी पंधरा हजारांचा तोटा
या बाबत शिरोली येथील सोयाबीन उत्पादक हनुमान थोरवे म्हणाले, ""बियाणे, खते, काढणी, मळणी, मशागत, वाहतूक आदीसाठी एकरी सुमारे तीस हजार रुपये खर्च झाला. एकरी सरासरी उत्पादन एक टन निघाले आहे. काळे व पांढरे अशा दोन राशीत सोयाबीनची विक्री करावी लागल्याने सोयाबीनला सरासरी प्रतिकिलो वीस रुपये भाव मिळाला. शेतकऱ्यांचा एकरी सुमारे पंधरा हजार रुपयांचा तोटा झाला आहे.''

पंचनामा अहवालानुसार तालुक्‍यात 8 हजार 589 हेक्‍टरमधील सोयाबीनचे तेहतीस टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सोयाबीन उत्पादकांना 2015 च्या सरकारी निर्णयानुसार एकरी 2 हजार 992 रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
- बापू रोकडे,
कृषी अधिकारी, जुन्नर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com