पुण्यात थंडीचा कडाका कायम 

पुण्यात थंडीचा कडाका कायम 

पुणे - पुणेकरांनो, गेल्या पाच दिवसांपासून थंडीचा कडाका सातत्याने वाढत असल्याचे आपण अनुभवत आहोत. यंदाच्या हिवाळ्यात तिसऱ्यांदा ९ अंश सेल्सिअसपेक्षा किमान तापमान कमी नोंदले गेले. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ८.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली. 

पुण्यात यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत थंड रात्री २२ डिसेंबरला होती. त्या रात्री किमान तापमान ८.१ अंश सेल्सिअस नोंदले होते. पुण्यात मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमान ८.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुढील दोन दिवसांमध्ये हवेतील गारठा कायम राहील असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविला आहे. 

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे पुण्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी थंडी वाढली. मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याची नोंद हवामान विभागाने घेतली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे 7 अंश सेल्सिअस नोंदले. 

मध्य प्रदेश ते विदर्भ दरम्यान असलेला कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे उत्तरेतून थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. त्याचा थेट परिणाम राज्यातील किमान तापमान कमी होण्यात झाला असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

राज्यात वाऱ्यांच्या प्रवाहासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने थंड हवेच्या परिणामामुळे वातावरणात बदल होत आहे आणि तापमानातही सातत्याने घटत आहे. पुढील दोन दिवस तापमानाची ही स्थिती कायम राहणार असून, त्यानंतर मात्र थंडी कमी होईल अशी शक्यता विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com