मदनवाडी येथे स्वच्छतागृह व बोगद्यासाठी प्रयत्न करु : खा. सुप्रिया सुळे

प्रा. प्रशांत चवरे
शनिवार, 21 एप्रिल 2018

मदनवाडी चौफुला येथील स्वच्छतागृह व सकुंडे वस्ती येथील बोगदा याबाबी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत गरजेच्या आहेत.

भिगवण : मदनवाडी चौफुला येथील स्वच्छतागृह व सकुंडे वस्ती येथील बोगदा याबाबी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत गरजेच्या आहेत. स्वच्छतागृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मदनवाडी ग्रामपंचायतीने उचलल्यास मदनवाडी चौफुला येथील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली सर्व सोयीनियुक्त असे स्वच्छतागृह उभारण्यासठी आवश्यक परवानगी व निधी मिळवुन देऊ तसेच बोगद्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे पाठपुरावा करु असे आश्वासन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.
    
भिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद मतदार संघातील मदनवाडी(ता.इंदापुर) येथे गावभेट कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. कार्यक्रमास आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, उपाध्यक्ष धनाजी थोरात, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, आबासाहेब देवकाते, राजेंद्र देवकाते, विष्णु देवकाते, भिगवणच्या सरपंच हेमाताई माडगे, उपसरपंच प्रदीप वकासे, सचिन बोगावत, मदनवाडीच्या सरपंच आम्रपाली बंडगर, माजी सरपंच ताई सकुंडे उपस्थित होते. सौ. सुळे पुढे म्हणाल्या, निवडणुका आल्यानंतर लोकांना भेटीसाठी सर्वचण येतात परंतु निवडणुका नसताना लोकांचे प्रश्न समजुन घेणे व ते सोडविणे महत्वाचे आहे. इंदापुर तालुक्यातील लोकांचे छोटे मोठे प्रश्न समजुन घेण्यासाठी गावभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

बारामती लोकसभा मतदार संघातील शिक्षण, अरोग्य, रस्ते आदी प्रश्न निकाली काढण्यात य़श आले आहे. यापुढील काळांमध्येही मतदार संघातील तरुणांना रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यावेळी मदनवाडी ग्रामस्थांच्या वतीने मदनवाडी चौफुला येथील स्वच्छतागृह, तरुणांना रोजगार व राष्ट्रीय महामार्गावर सकुंडे वस्ती येथे बोगदा आदी प्रश्न मांडले. त्यास खासदार सुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना करु असे सांगितले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी महिलांशी संवाद साधत त्याच्या समस्या जाणुन घेण्याचा प्रयत्न केला. प्रास्ताविक व सुत्रसंचालन धनाजी थोरात यांनी केले तर आभार अजिनाथ सकुंडे यांनी मानले.

Web Title: Madanwadi Toilet and Tunnel will take efforts says MP Supriya Sule