महादेव जानकर म्हणतात, 'मी खासदार होणार, माझ्यासाठी सगळे पर्याय खुले'

महादेव जानकर म्हणतात, 'मी खासदार होणार, माझ्यासाठी सगळे पर्याय खुले'

बारामती : राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रीय समाज पक्ष आगामी निवडणूकीत लक्ष केंद्रीत करणार असून किमान वीस आमदार निवडून आणण्याच्या दृष्टीने संघटना बांधणीचे काम हाती घेतल्याची माहिती राष्ट्रीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली. बारामतीत आज  संदीप चोपडे यांच्या कार्यालयात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ज्ञानेश्वर सलगर, माणिकराव दांगडे, अँड. अमोल सातकर, किरण गोफणे आदी या प्रसंगी उपस्थित होते. 

जानकर म्हणाले, परभणी, जालना, हिंगोली, माढा, बारामती या सह पाच मतदारसंघावर मी लक्ष केंद्रीत करणार आहे. या मतदारसंघातील किमान वीस विधानसभा मतदारसंघातून आमदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमची आमदारांची संख्या वाढली तर राज्याच्या सत्ताकारणात आमच्याशिवाय सरकारच बनणार नाही अशी स्थिती होईल. मी सध्या आमदार असलो तरी 2024 च्या निवडणूकीत मी परभणी, माढा किंवा बारामती या पैकी एका लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचेही जानकर यांनी स्पष्ट केले. 

सध्यातरी मी भाजपसोबतच आहे, महाविकासआघाडीकडे माझा कल नाही, पण भविष्यात जर काही गोष्टी वेगळ्या घडल्या तर सगळेच पर्याय आमच्यासमोर खुले आहेत, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. भाजपाला देखील मी माझे उपद्रवमूल्य दाखवून देणार असल्याचाही इशारा जानकर यांनी दिला.  मी एका पक्षाचा प्रमुख असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, कॉंग्रेस सर्वच पक्षांच्या प्रमुखांसोबत माझे मैत्रीचे संबंध असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

धनगर समाजबांधवाना आदिवासीच्या 22 योजनांच्या सवलती मिळाव्यात या साठी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना अध्यादेश काढला, एक हजार कोटींची तरतूदही केली होती, मात्र त्याच वेळेस आचारसंहिता लागली व सरकार गेले. दुर्देवाने महाविकासआघाडीच्या सरकारनेही तरतूद केलेली नव्हती मात्र मी सभागृहात मुद्दा मांडल्यानंतर अजित पवार यांनी शंभर कोटींची तरतूद या साठी केली. या सवलती मिळण्यासाठी राजकीय दबाव तयार करावा लागेल, असे जानकर म्हणाले. विद्यमान सरकारवर मला टीका करायची नाही पण त्यांनी तरतूद करायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com