‘महाजनादेश’विरोधात ‘आक्रोश’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

ईडी, आयडी भाजपचे कार्यकर्ते 
ईडी आणि आयडी हे दोन भाजपचे बलदंड कार्यकर्ते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे या कार्यकर्त्यांना विरोधकांच्या घरी पाठवून भाजपमध्ये येण्यास भाग पाडत आहेत, असा टोला शेट्टी यांनी लगावला.

पुणे - ‘राज्यातील कोणतेच प्रश्‍न सुटलेले नसताना पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. त्यासाठी गुरुवारपासून (ता. १) महाजनादेश यात्रा काढत आहेत. मात्र, त्यापूर्वी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विचारलेल्या अकरा प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, अन्यथा महाजनादेश यात्रेच्या मार्गावरूनच आक्रोश यात्रा काढून याचा जाब विचारू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांना प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आम्ही ११ दिवस वाट पाहू. त्यानंतर त्यांच्याच महाजनादेश यात्रेच्या मार्गावरून आमची आक्रोश यात्रा काढू. बांधकाम कामगार कल्याण मंडळातून किती लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे पैसे दिले?, पीकविम्यातील भ्रष्टाचाराची माहिती देणार का?, पाशा पटेल यांनी कृषिमूल्य आयोगाला केलेल्या शिफारशी योग्य आहेत का ?, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एसटीबीटी बियाणे वापरल्यास शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करू, याचे उत्तर देणार का?, शेतकऱ्यांची एफआरपी थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर काय कारवाई करणार?,  भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना पक्षात घेतल्याबद्दल बोलणार का, धनगर समाजाला एसटी आरक्षण दिले का?, लिंगायत समाजाला ओबीसीचे आरक्षण दिले की स्वतंत्र धर्माचा दर्जा देणार, मेगा भरतीचं काय झालं?, कंत्राटी कामगारांबाबत धोरण काय? आणि कृषी वीज जोडणीमध्ये शेतकऱ्यांला लावलेला वीज दर योग्य आहेत का?  या प्रश्‍नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावीत, असे आव्हान शेट्टी यांनी दिले.

‘विधानसभा लढणार नाही’
विधानसभेतील आघाडीबाबत शेट्टी म्हणाले, की आम्ही ५० जागा मागितल्या आहेत. काही कमी जागा मिळाल्या, तरी चालतील. वंचित आघाडीशीही चर्चा सुरू आहे. पण, मी स्वतः विधानसभेची निवडणूक लढवणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahajanadesh Yatra Oppose Aakrosh Yatra by Raju Shetty Politics