
या गावातून आतापर्यंत पोलिस आयुक्त, आयुक्त, सहआयुक्त, उत्पादन शुल्क अधीक्षक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदी आयएएस व आयपीएस अधिकारी बाहेर पडले आहेत.
महाळुंगे पडवळ : महाराष्ट्र राज्य हे रत्नांची खाण म्हणून ओळखले जाते. अनेक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी याच महाराष्ट्राच्या भूमीतून निर्माण झाले. आणि त्यांच्यामुळे त्यांची गावेही प्रसिद्धीच्या झोतात आली.
असंच एक गाव त्याच्या अनोख्या वैशिष्ट्यामुळे सध्या चर्चेत येऊ लागलं आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ हे गाव 'अधिकाऱ्यांचं गाव' म्हणून प्रसिद्धीच्या झोतात येत आहे.
- ताज्या बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप
आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक उच्चपदस्थ अधिकारी निर्माण करणारे गाव म्हणून महाळुंगे पडवळ गावाची ओळख होऊ लागली आहे. एक-दोन नव्हे, तर तब्बल 25 हून अधिक जण प्रशासकीय सेवेत आहेत.
आपल्याप्रमाणेच गावातील मुले प्रशासकीय सेवेत यावीत म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी ते गावात येतात. सर्व अधिकारी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांतील असल्यामुळे गावावर, शाळेवर त्यांचे विशेष प्रेम आणि आपुलकी आहे.
- भारताचा चीनला इशारा; नौदलाची अभिमानास्पद कामगिरी
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कळंब (ता. आंबेगाव) येथून दहा किलोमीटर अंतरावर बाबू गेनू यांचे महाळुंगे पडवळ गाव आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानामुळे गावाचे नाव जगाच्या नकाशावर पोचले. एवढेच नव्हे, तर आता सर्वाधिक अधिकारी तयार करणारे गाव म्हणून महाळुंगे पडवळचा उल्लेख करावा लागत आहे.
या गावातून आतापर्यंत पोलिस आयुक्त, आयुक्त, सहआयुक्त, उत्पादन शुल्क अधीक्षक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदी आयएएस व आयपीएस अधिकारी बाहेर पडले आहेत. एवढेच नाही, तर या गावातील इतर मुले बँक आणि खासगी कंपन्यांमध्ये अधिकारीपदावर आहेत.
- 'एसपीजी सुरक्षा फक्त पंतप्रधानांनाच; तो स्टेटस सिंबॉल नाही'
1965 मध्ये गावातील के. डी. शिंदे यांना पहिल्यांदा अधिकारी होण्याचा बहुमान मिळाला. गावाने दिलेल्या लोकवर्गणीतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. ते राज्याच्या उपसचिवपदावर सेवानिवृत्त झाले. पुणे जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश म्हणून (कै.) छायाताई पडवळ यांनी देखील काम केले होते.
हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किसनराव सैद म्हणाले, ''गावातील उच्चपदावर पोचलेले सर्व अधिकारी हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून हुतात्मा बाबू गेनू विद्यालय व श्री. विठ्ठल गबाजी कापूसकर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतलेले आहे. या पुढील काळातही राजपत्रित अधिकारी वर्गाची संख्या वाढावी म्हणून हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानने विद्यालयामध्ये मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. उच्चपदावर असलेले अधिकारी येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळते.''
- अयोध्या प्रकरण : मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडणाऱ्या धवन यांच्याबाबत घेतला मोठा निर्णय
उच्चपदांवर कार्यरत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे :-
1) वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ
2) केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे संचालक कर्नल प्रमोद दहितुले
3) मुंबईचे सहाय्यक आयुक्त अभिजित थोरात
4) सेवा व कर विभागाचे सहआयुक्त संजीव सैद पाटील
5) सिडको मुंबईचे उपजिल्हाधिकारी अजिंक्य पडवळ
6) ठाण्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश राजन आंबटकर
7) उत्पादन शुल्क सातारा विभागाचे अधीक्षक अनिल चासकर
8) कोल्हापूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके
9) विक्रीकर निरीक्षक शंकर बनकर
10) समाजकल्याण आयुक्तालयाचे अधीक्षक रमेश सैद
11) कोकण विभागाचे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रकाश आवटे
12) सीआयडीचे पोलिस निरीक्षक ताराचंद भालेराव
13) पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चासकर
14) पोलिस निरीक्षक अनिल पडवळ
15) उपवनसंरक्षक जयसिंग पडवळ
16) तालुका कृषी अधिकारी लीना सैद
17) लष्करातील अधिकारी प्रतीक दहितुले
18) लष्करातील अधिकारी प्रशांत चासकर
19) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर
20) महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे-गावडे.