कोरोनाला हरविलेल्या पुण्यातील या गावाचे करावे तेवढे कौतुक कमीच

विवेक शिंदे
Tuesday, 4 August 2020

आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे कोरोना रुग्णांची संख्या १९ वर पोहोचल्याने गाव कोरोना रुग्णांच्या संख्येत तालुक्यात दुसऱ्या क्रमांकावर आले होते. मात्र,

महाळुंगे पडवळ (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे कोरोना रुग्णांची संख्या १९ वर पोहोचल्याने गाव कोरोना रुग्णांच्या संख्येत तालुक्यात दुसऱ्या क्रमांकावर आले होते. मात्र, ग्रामस्थ, आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी, पोलिस पाटील, शिक्षक, आशा वर्कर, महसूल विभाग व पोलिस अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून एकजूट दाखविल्यामुळे गाव कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य

महाळुंगे पडवळ येथे जुलै महिन्याच्या सुरुवातील सैदमळा येथे ४० वर्षी तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तो मंचर येथील एका एटीएममधून पैसे काढल्यानंतर घरी आल्यानंतर त्याला थकवा व अंगदुखीचा त्रास जाणवू लागला होता. त्याच्या कुटुंबांतील ३ जणांना व संपर्कातील चार जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर चासकरमळा येथील नागरिक एका दशक्रियाविधीसाठी गेला होता. त्याला व कुटुंबांतील तीन जणांना कोरोनाची लागण झाली. सोलाटमळा येथे एकूण पाच जणांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यामुळे रुग्ण संख्येच्या बाबतीत तालुक्यात गाव दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा वर्कर, पोलिस पाटील, मंचर पोलिस ठाणे आदी कार्यालयामार्फत गावात विविध उपाय योजना केल्या जात आहेत. परंतु, रुग्ण संख्येत होणारी वाढ ही प्रशासनाची डोके दुखी ठरत आहे.

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून सरकारला घरचा आहेर... 

सैदवाडी येथील कोरोनाची लागण झालेल्या ४० वर्षीय तरुण व त्यांच्या कुटुंबियांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर हळूहळू गावातील रुग्णांनी कोरोनावर मात करून ते घरी परतले आहेत. महाळुंगे पडवळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी गिते, आरोग्य पर्यवेक्षक डॉ. भास्कर साबळे, आरोग्य सहायक दतात्रेय भागवत, सरपंच अनिल सैद, उपसरपंच बेबीताई पडवळ, मंचर पोलिस ठाण्याचे बीट अंमलदार राजेंद्र हिले, पोलिस पाटील सविता पडवळ, ग्रामविकास अधिकारी मनोज भुजबळ, तलाठी शशांक चौदंते, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थांनी दिलेल्या योगदानामुळे महाळुंगे पडवळ गाव कोरोनामुक्त झाले आहे. गावातील सर्व १९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘सैदमळा, चासकरमळा, सोलाटवस्ती, आवटेमळा येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. येथील नागरिकांनी विशेष काळजी घेणे अपेक्षित असताना कंटेनमेटझोनच्या नियमांचे पालन मात्र केले जात नव्हते. त्यामुळे वाढत चाललेली रुग्ण संख्या डोके दुखी ठरत होती. मात्र, ग्रामस्थांनी दाखविलेल्या धैर्यामुळे रुग्ण संख्या अटोक्यात आणण्यात यश आले आणि गाव कोरोनामुक्त झाले. येथून पुढेही प्रत्येकाने वेळोवेळी हात धुवून मास्क व सॅनिटायझरचा वापर करुन वैयक्तीक खबरदारी घ्यावी. तसेच, पावसाळ्याचे दिवस असल्याने डेंगी, हिवताप, टायफाॅईड, अतिसार या सारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे पाणी गाळून उकळून प्यावे, असे आवाहन महाळुंगे पडवळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक डॉ. भास्कर साबळे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahalunge Padwal village overcomes corona disease