esakal | Maharashtra Budget 2021: रिंग रोड, पुणे-नाशिक लोहमार्गामुळे पुण्याच्या विकासाला चालना मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

Pune_Ring_Road

पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ उभारण्याची घोषणा या अर्थसंकल्पात झाली आहे. पुण्यात जागतिक दर्जाचे म्हाळुंगे-बालेवाडी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे. या पार्श्वभूमीवर आता क्रीडा विद्यापीठ साकारणार आहे.

Maharashtra Budget 2021: रिंग रोड, पुणे-नाशिक लोहमार्गामुळे पुण्याच्या विकासाला चालना मिळणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत असलेल्या रिंग रोड आणि पुणे- नाशिक लोहमार्ग या प्रकल्पांना मंजुरी देतानाच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, जैव सुरक्षा प्रयोगशाळा आदी प्रकल्पांच्या घोषणेमुळे पुण्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बहुचर्चित पुण्याच्या रिंग रोडला मंजुरी देतानाच तब्बल २६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) हा रिंग रोड होणार आहे. त्याची लांबी सुमारे १७० किलोमीटर असून हा आठ पदरी रस्ता असेल. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर हा रस्ता साकारणार असून त्यासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया या पूर्वीच सुरू झाली आहे. या रस्त्यामुळे पुणे शहरातील वाहतुकीच्या कोंडीची समस्या कमी होईल, अशी अपेक्षा आहे. या रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया या वर्षी सुरू होणार आहे.

Maharashtra Budget 2021 : अर्थमंत्री अजित पवारांनी बजेटमध्ये मुंबईबद्दल मांडलेले २० महत्वाचे मुद्दे​

बहुप्रतिक्षेत असलेला पुणे-नाशिक लोहमार्गाला अखेर मंजुरी मिळाली आहे. सुमारे १६ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून तो ‘पीपीपी’ तत्त्वावर साकारणार आहे. या प्रकल्पाला रेल्वे खात्याने या पूर्वीच मंजुरी दिली आहे. या लोहमार्गाची लांबी २३५ किलोमीटर असून ताशी २०० किलोमीटर वेगाने त्यावर रेल्वे धावणार आहे. या मार्गावर २४ स्थानके होणार आहेत. हा मार्ग कार्यान्वित झाल्यावर पुणे-नाशिक हे लोहमार्गाद्वारे अंतर दोन तासांत प्रवाशांना कापता येईल, अशी अपेक्षा आहे. ‘महारेल’च्या माध्यमातून पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून हा प्रकल्प होईल.

Maharashtra Budget 2021: देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया​

पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ उभारण्याची घोषणा या अर्थसंकल्पात झाली आहे. पुण्यात जागतिक दर्जाचे म्हाळुंगे-बालेवाडी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे. या पार्श्वभूमीवर आता क्रीडा विद्यापीठ साकारणार आहे. त्याचा पुरेसा तपशील अद्याप जाहीर झालेला नाही. तसेच साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेता जैव सुरक्षा प्रयोगशाळाही आता पुण्यात साकारणार आहे. या प्रयोगशाळेत साथीच्या रोगांवर संशोधन करून त्या माध्यमातून उपाययोजना करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. मात्र, पुण्यातील उद्योग क्षेत्र, स्टार्टअप्स यांच्यासाठी मोठ्या घोषणा अपेक्षा होती, असा सूर उद्योग क्षेत्रातून व्यक्त झाला आहे.

देवगड हापूस आंब्यांची मार्केट यार्डात आवक वाढली

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक वर्षांत महापालिका निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही शहरांना उपयुक्त ठरणारा रिंग रोड आणि पुणे- नाशिक लोहमार्ग मंजूर झाला आहे. त्यामुळे दोन्ही शहरांच्या वाहतुकीच्या कोंडीवर येत्या किमान पाच वर्षांत मार्ग निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image