सांगली

सांगली
Published on

दोन महिन्यांत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर कर्जमुक्तीची रक्कम
--
मुख्यमंत्री फडणवीस ः प्रोत्साहनपर अनुदानही देण्याची ग्वाही

ॲग्रोवन वृत्तसेवा

सांगली : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’च्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सुमारे सहा लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर पाच हजार २९ कोटी रुपये वर्ग करून त्यांना कर्जमुक्तीचा लाभ दिला आहे. येत्या दोन महिन्यांत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर कर्जमुक्तीची रक्कम जमा केली जाईल. त्याचबरोबर प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कमही शेतकऱ्यांना दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आष्टा येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत रविवारी (ता. ९) माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या ‘आम्रवृक्ष’ या आत्मचरित्राचे प्रकाशन, तसेच शैक्षणिक संकुलातील विविध इमारतींचे उद्‍घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार धैर्यशील माने, धनंजय महाडिक, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुहास बाबर, अरुण लाड, माजी खासदार संजय पाटील, विश्वास डांगे, चिमण डांगे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, की ऐंशीच्या दशकात शेतकरी नेते शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा उभारला होता. त्या वेळी भाजपनेही कर्जमाफीचा मुद्दा घेऊन लढ्यात उतरावे, अशी भूमिका डांगे यांनी घेतली होती. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे असून, त्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी ते आग्रही होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपनेही कर्जमाफीचा लढा सुरू केला.

‘‘अण्णासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना काय भेट द्यावी, असा विचार होता. त्यांनी त्या काळात कर्जमाफीसाठी केलेला लढा लक्षात घेता शेतकऱ्यांची कर्जमाफी हीच त्यांना खरी भेट ठरेल. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असून, राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर दोन महिन्यांत कर्जमाफीची रक्कम जमा होईल,’’ असे फडणवीस यांनी सांगितले.

डांगे यांच्याकडे पाणीपुरवठा खात्याची जबाबदारी असताना महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याची त्यांची भूमिका होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून गावागावांत पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असे फडणवीस यांनी सांगितले.

ॲड. नार्वेकर, प्रा. शिंदे आणि पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. चिमण डांगे यांनी प्रास्ताविक केले.
--
‘त्यांच्या मनात राम होताच’

अण्णासाहेब डांगे यांच्या राजकीय वाटचालीचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले, ‘‘अण्णासाहेबांचे व्यक्तिमत्त्व परखड आहे. मधल्या काळात त्यांनी भाजपला रामराम केला; मात्र ते आपल्या विचारांपासून दूर गेले नाहीत. त्यांच्या मनात राम होताच आणि आहे. त्यामुळे ते पुन्हा रामाकडे आले.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com