मुंबई

मुंबई
Published on

खासगी वाटाघाटीद्वारे जमीन
दिलेल्यांना प्रकल्पग्रस्त लाभ

मदत व पुनर्वसन विभागाचा निर्णय; मंत्रालयात नुकतीच झाली होती बैठक

मुंबई : राज्यातील सार्वजनिक प्रकल्पांसाठी खासगी वाटाघाटीद्वारे स्वेच्छेने आपली जमीन उपलब्ध करून दिलेल्या भूमीधारकांना व त्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव पाटील आणि राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी घेतला आहे.
या बाबत मदत व पुनर्वसनमंत्री यांच्याकडे राज्यातील विविध प्रकल्पग्रस्त संघटनांच्या प्रतिनिधींची एकत्रित बैठक २० जुलै रोजी मंत्रालयातील दालनात घेण्यात आली होती. दोन आठवड्यांतच याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत देखील थेट खरेदी/खासगी वाटाघाटीद्वारे जमिनी दिलेल्या व्यक्तींच्या प्रकल्पग्रस्त दर्जाबाबत आग्रही मागणी करण्यात आलेली होती. ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन मदत व पुनर्वसनमंत्री जाधव पाटील तसेच राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी खासगी वाटाघाटीद्वारे सार्वजनिक प्रकल्पांसाठी जमीन दिलेल्या भूमीधारकांनाही प्रकल्पग्रस्त म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संबंधितांना शासनाच्या प्रकल्पग्रस्त धोरणांतर्गत उपलब्ध असलेल्या विविध लाभ, सवलती आणि पुनर्वसनाशी संबंधित सुविधांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सार्वजनिक प्रकल्पांना ज्यांनी थेट खरेदीद्वारे जमिनी दिल्या आहेत. तसेच ज्यांच्या जमिनी भूसंपादन अधिनियमान्वये संपादित करण्यात आलेल्या आहेत, त्या सर्वांनी राज्याच्या विकासात त्यांच्या वडिलोपार्जित/स्व कष्टार्जित जमिनी देऊन योगदान दिले आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक प्रकल्पाकरिता जमीन कोणत्या पद्धतीने ताब्यात घेतली आहे, यावरून भूधारक प्रकल्पग्रस्तांमध्ये भूसंपादन व थेट खरेदी अशा दोन्ही प्रकरणी सर्वांना एकसमान न्याय देणे आवश्यक होते.
आजपर्यंत भूसंपादन कायद्यांतर्गत संपादित झालेल्या जमिनींच्या मालकांना विविध सवलती व लाभ उपलब्ध होत होते. मात्र सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांना गती मिळावी या उद्देशाने अनेक शेतकरी व भूमीधारकांनी खासगी वाटाघाटीद्वारे जमीन दिली असतानाही त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता मिळत नव्हती. त्यामुळे या भूमीधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या बाबत विविध लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त, संघटना यांनी वेळोवेळी शासनाकडे निवेदने सादर केलेली होती.
राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले, की खासगी वाटाघाटीद्वारे सार्वजनिक प्रकल्पांसाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना/व्यक्तींना तसेच त्यांच्या वारसांना आता प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळणार असल्याने ते नोकरीसाठी, शैक्षणिक प्रयोजनासाठी राखीव असलेल्या जागांकरिता अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत.

कोट ----
या निर्णयामुळे सार्वजनिक प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या भूमीधारकांना न्याय मिळणार असून, शासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होईल. तसेच भविष्यात सार्वजनिक विकास प्रकल्पांसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून घेण्याच्या प्रक्रियेलाही गती मिळण्यास मदत होईल.
- मकरंद जाधव पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com