महाराष्ट्र पोलिसांचा संघ अव्वल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

कॉम्प्युटर जनजागृतीत कुंभार यांना सुवर्णपदक 
कॉम्प्युटर जनजागृती स्पर्धेत पहिल्या भागात पोलिस निरीक्षक विजय कुंभार (बिनतारी संदेश विभाग, पुणे) यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. तर, दुसऱ्या विभागात पोलिस नाईक हनुमंत भोसले (सातारा) यांनी 
रौप्यपदक मिळविले. पोलिस व्हिडिओग्राफी या विभागामध्ये समीर 
बेंदगुडे (राज्य राखीव पोलिस बल, गट क्रमांक एक) यांनी कांस्यपदक मिळविले.

पुणे - उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात झालेल्या विविध स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद चषक पटकाविले. यात विविध पदकांची कमाई करीत महाराष्ट्राच्या संघाने देशात पहिला येण्याचा मान मिळविला.

देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये व्यावसायिक नैपुण्य व कौशल्यवाढीसाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात देशातील २८ राज्ये व संघराज्यातील पोलिसांच्या संघांनी सहभाग 
नोंदविला. 

संघव्यवस्थापक पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर व सहव्यवस्थापक अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या संघातील ४० स्पर्धक या संघात सहभागी झाले होते. या मेळाव्यामध्ये महाराष्ट्राच्या संघाने पाच सुवर्ण, तीन रौप्य व चार कांस्य अशी बारा पदके प्राप्त केली. सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन या प्रकारातील लेखी चाचणी विभागात सहायक पोलिस निरीक्षक (लातूर) अमोल पवार यांनी सुवर्ण, पोलिस निरीक्षक मधुकर गिते (मुंबई शहर) यांनी रौप्य, तर सहायक पोलिस निरीक्षक राहुल खटावकर (औरंगाबाद) यांनी कांस्यपदक पटकाविले. स्पर्धेतील फॉरेन्सिक सायन्स विभागात नितीन गिते यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

याबरोबरच अँटिसबोटॅग चिक या विभागातील ‘रूम सर्च’ प्रकारामध्ये तृतीय क्रमांकाची दोन पदके पोलिस हवालदार अनिल साळुंखे (राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे) व पोलिस कर्मचारी अमोल चंद्रकांत गवळी (सातारा) यांनी पटकाविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Police Team Topper