पूर्व परीक्षा आता वर्षातून दोनदा

पूर्व परीक्षा आता वर्षातून दोनदा
Published on

पुणे, ता. २६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित (गट-अ व गट-ब), महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा आता वर्षातून केवळ एकदाच न घेता, दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, याची अंमलबजावणी २०२७ पासून होणार आहे.

यासंदर्भात आयोगाने प्रसिद्धिपत्रक जारी करत माहिती दिली आहे. सद्यःस्थितीत आयोगामार्फत या तिन्ही पूर्व परीक्षा वर्षातून केवळ एकदाच घेतल्या जातात. पूर्व परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरत नाहीत, तथापि ते सातत्याने या परीक्षांची तयारी करत असतात. परीक्षा वर्षातून एकदाच होत असल्याने उमेदवारांवर अनावश्यक ताण येतो. हा मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि उमेदवारांना यश मिळवण्याच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोगाने या परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे आयोगाने सांगितले आहे.

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील. तसेच, या परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेणे आवश्यक ठरले, तर उमेदवारांच्या गुणांचे समानीकरण करण्याच्या पद्धतीचा वापर केला जाईल. विशेष म्हणजे, पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा होणार असल्या, तरी संबंधित सेवेची मुख्य परीक्षा मात्र वर्षातून एकदाच घेतली जाईल. संबंधित सेवेच्या घेण्यात आलेल्या दोन किंवा अधिक पूर्व परीक्षांपैकी कोणत्याही एका पूर्व परीक्षेतून पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्या वर्षाच्या संबंधित मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविले जाईल.

२०२७ पासून अंमलबजावणी
या नव्या कार्यपद्धतीची अंमलबजावणी २०२७ च्या पूर्व परीक्षांपासून लागू केली जाणार आहे. पूर्व परीक्षांमधून मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना पात्र ठरविण्यासंदर्भातील सविस्तर कार्यपद्धती आयोगाकडून लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती आयोगाच्या परीक्षा नियंत्रक व सहसचिव (गोपनीय आणि धोरण व संशोधन) सरिता बांदेकर-देशमुख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MPSC to conduct preliminary exams twice or more annually from 2027
MPSC Group C Recruitment 2026: Online Applications Open Till July 17
Nine Failures, One Determination: Abhimanyu’s Journey to MPSC Success Wins Hearts
MPSC Group-B Exam 2026: Prior Authorization Required for Scribe Assistance
Marathi News Esakal
www.esakal.com