मावळ : कोण आला रे कोण आला, मावळचा वाघ आला...| Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

- आमदार सुनील शेळके समर्थकांचा तालुक्‍यात जल्लोष 
- राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे हॅटट्रिकचे मनसुबे उधळले

तळेगाव स्टेशन (पुणे) : अवघ्या पुणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मावळ मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भातील सर्व अंदाज फोल ठरवीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हॅटट्रिकचे मनसुबे उधळून लावले. विजयानंतर शेळके समर्थकांनी एकच जल्लोष केला. 

पंचवीस वर्षांच्या सत्तापालटानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तब्बल 92 हजारांपेक्षाही अधिक मताधिक्‍याने आमदार म्हणून निवडून आलेल्या सुनील शेळके यांच्या विजयाचा जल्लोष त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते यांनी "कोण आला रे कोण आला मावळचा वाघ आला' अशा घोषणा देत भंडारा उधळत साजरा केला. वीस फेऱ्यातील मताधिक्‍याचा अंदाज घेऊन साधारणतः दुपारी बाराच्या सुमारास शेळके नूतन महाविद्यालयाच्या आवारातील मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले. चाकण महामार्गावर येताच शेळके यांना खांद्यावर घेत विजयाचा जल्लोष केला. 

मावळच्या ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात राष्ट्रवादीचा आणि शिवरायांचा भगवा झेंडा हातात घेऊन मिरवणुकीला सुरवात केली. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. चाकण महामार्गावरून स्टेशन चौकमार्गे मिरवणूक तळेगावकडे गेली. विजयाचे शिल्पकार संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, उद्योजक किशोर आवारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक किशोर भेगडे, गणेश खांडगे, जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मिरवणुकीत शेळके यांच्यासोबत जल्लोष करताना दिसले. उधळलेल्या विजयाच्या भंडाऱ्यामुळे अवघा तळेगाव चाकण-महामार्ग पिवळाधमक झाला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election pune maval final result ncp sunil shelke won