भोर : चुरशीच्या लढतीत संग्राम थोपटे यांची हॅटट्रिक | Election Results 2019

विजय जाधव
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

भोर विधानसभा मतदारसंघाच्या चुरशीच्या लढतीत महाआघाडीतील काॅंग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी विजयाची हॅटट्रीक केली. अतितटीच्या लढतीत संग्राम थोपटे हे 9 हजार 206 मतांनी विजयी झाले.

भोर (पुणे) : भोर विधानसभा मतदारसंघाच्या चुरशीच्या लढतीत महाआघाडीतील काॅंग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी विजयाची हॅटट्रीक केली. अतितटीच्या लढतीत संग्राम थोपटे हे 9 हजार 206 मतांनी विजयी झाले.

संग्राम थोपटे यांना 1 लाख 8 हजार 925 मते मिळाली तर त्यांचे प्रमुख विरोधक महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार कुलदीप कोंडे यांना 99 हजार 716 मते मिळाली.

भोर येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत गुरुवारी (ता.24) सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणीच्या सहाव्या फेरीपर्यंत संग्राम थोपटे आघाडीवर होते, त्यानंतर सातव्या फेरीपासून ते 19 व्या फेरीपर्यंत कुलदीप कोंडे यांनी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र संग्राम थोपटे यांच्या आघाडीचा आकडा विजयापर्यंत वाढत गेला. टपाली मतदानातही संग्राम थोपटे यांना 527 तर कुलदीप कोंडे यांना 243 मते मिळाली. दुपारी दोन वाजता मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी संग्राम थोपटे यांना निवडीचे पत्र दिले.

भोर मतदारसंघात 2 लाख 28 हजार 264 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी 1 हजार 827 मतदारांनी नोटाचा वापर केला. आमदार संग्राम थोपटे यांनी  47.72 टक्के मते मिळाली, तर कुलदीप कोंडे यांनी 43.69 टक्के मते मिळवली. राष्ट्रवादीतून उमेदवारीसाठी शिवसेनेत गेलेले, परंतु उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून रिंगणात असलेले आत्माराम कलाटे यांना केवळ 7 हजार 380 मते मिळाली. अपक्ष उमेदवार मानसी शिंदे यांना सर्वात कमी 957 मते मिळाली.

निकालानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी संग्राम थोपटे यांचे अभिनंदन केले. तर संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरुपा थोपटे, बहीण डॉ. भाग्यश्री पाटील, सविता पाटील व वैशाली मंत्री यांनी औक्षण करून पेढा भरविला. या वेळी थोपटे यांचे नातेवाईक, कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयानंतर कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. 
 

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे   
अनिल प्रकाश मातेरे (मनसे,3055), कुलदीप सुदाम कोंडे (शिवसेना,99716), संग्राम अनंतराव थोपटे (कॉंग्रेस,108925), पंढरीनाथ संपत सोंडकर (संभाजी ब्रिगेड,1469), भाऊ पांडुरंग मरगळे (वंचित आघाडी,4929), आत्माराम जयवंत कलाटे (अपक्ष, 7380) आणि मानसी सुरेश शिंदे (अपक्ष, 957).
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result