
हरियानाच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध
हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर अत्यंत घृणास्पद टीका केली आहे, त्याचा काँग्रेस निषेध करत आहे. खट्टर यांच्याकडून केली गेलेली टीका हे त्यांचे संस्कार आहेत. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत, अशी टीका माजी खासदार रजनी पाटील यांनी केली आहे.
विधानसभा 2019 : पुणे - ‘युती सरकारच्या काळातील मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली राजीनामा देण्याची वेळ आली होती. काँग्रेस हा भ्रष्टाचारी पक्ष असल्याची टीका करणारे शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे कसे विसरत आहेत,’’ असा प्रश्न उपस्थित करून, ‘‘ज्यांची घरे काचेची असतात, त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नयेत,’’ अशा शब्दांत काँग्रेसच्या प्रवक्त्या जरीता लाईथपलांग यांनी पत्रकार परिषदेत टीका केली. आदित्य ठाकरे यांनी तरुणांसाठी काय केले, असा सवालही त्यांनी केला.
लाईथपलांग म्हणाल्या, ‘पुण्यामधील पाच हजार १४५ कंपन्यांमध्ये सहा लाख ३३ हजार लोक काम करतात. या उद्योगांवर जवळपास २१ लाख रोजगार अवलंबून असून, त्यातील निम्म्याहून अधिक रोजगार मंदीमध्ये गेले आहेत. महाराष्ट्रातील बेरोजगारीचा दर हा पावणेसहा टक्क्यांवर आहे. ठाकरे यांनी रोजगार मिळवून देण्यासाठी काय केले? मोदी सरकारने दर महिन्याला दोन कोटी रोजगार मिळवून देण्याची घोषणा केली होती. तिचे काय झाले, याचे उत्तर भाजपने दिले पाहिजे.’’ याप्रसंगी रजनी पाटील, ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे, सुनील शिंदे उपस्थित होते.