Vidhansabha 2019 : आघाडीने द्याव्यात 55- 60 जागा - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करण्यात येणार असून, प्रजा लोकशाही परिषदेच्या वतीने भटक्‍या विमुक्तांसह वंचित घटकांसाठी 55 ते 60 जागांची मागणी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे "दरबारी राजकारणी' असून, त्यांच्याविरुद्ध आपण विधानसभा निवडणुकीत लढण्यास तयार आहोत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

विधानसभा 2019 : पुणे / मयूर कॉलनी - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करण्यात येणार असून, प्रजा लोकशाही परिषदेच्या वतीने भटक्‍या विमुक्तांसह वंचित घटकांसाठी 55 ते 60 जागांची मागणी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे "दरबारी राजकारणी' असून, त्यांच्याविरुद्ध आपण विधानसभा निवडणुकीत लढण्यास तयार आहोत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्ष आणि संघटनांनी प्रजा लोकशाही परिषदेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी (ता.20) प्रजा लोकशाही परिषद सत्ता परिवर्तन मेळावा घेण्यात आला.

शेट्टी म्हणाले, कॉंग्रेस- राष्ट्रवादीशी सध्या 34 जागा देण्याबाबत बोलणी सुरू आहे. आणखी 15 ते 20 जागा वाढवून मिळतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, जागा वाटपाबाबत लवचिक भूमिका आहे. जागांबाबत वाद घातला जाणार नाही.

विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे; परंतु माझी मानसिकता झालेली नाही. जर चंद्रकांत पाटील हे ग्रामीण भागातून विधानसभा निवडणूक लढवणार असतील तर मी त्यांच्या विरोधात उभा राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले.

देशातील हजारो तरुणांचा रोजगार गेला आहे. याबाबत केंद्र सरकारकडून भूमिका मांडली जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यात तरुणांच्या प्रश्नांवर बोलतील, असे अपेक्षित होते; परंतु त्यांनी नेहमीप्रमाणे भाषण करून जनतेची दिशाभूल केली. त्यामुळे तरुणांनी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्‍न त्यांनी केला.

याप्रसंगी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, बारा बलुतेदार संघटनेचे कल्याणराव दळे, मुस्लिम ओबीसी संघटनेचे शब्बीर अन्सारी, जयंत पाटील, दशरथ राऊत, अभयसिंह पाटील, दीनानाथ वाघमारे, सतीश कसवे, दशरथ मडावी, डॉ. महेंद्र धावडे, ओबीसी, भटके विमुक्त, गोर बंजारा समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Aghadi Raju Shetty Seats Demand Politics