Vidhan Sabha 2019 : बारामतीकरांचा बंदोबस्त करतो - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 October 2019

‘पाटील यांचा सासुरवास संपला’
लोकसभा निवडणुकीवेळीच हर्षवर्धन पाटील यांना भाजपप्रवेशाचे आमंत्रण दिले होते. मात्र, त्यांनी यायला वेळ लावला. त्यांनी आत्तापर्यंत बारामतीकरांचा सासुरवास सहन केला. मात्र, आता ते माहेरी आले आहेत. त्यांना आता सासुरवास सोसावा लागणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

विधानसभा 2019 : इंदापूर - ‘मी, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व हर्षवर्धन पाटील भोलेनाथाचा त्रिशूल आहोत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. बारामतीचे नेते येथे येऊन त्रास देतील, म्हणून त्यांना घाबरून जाऊ नका. मी बारामतीकरांचा बंदोबस्त करण्यासाठीच आलो आहे,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला.

महायुतीचे उमेदवार पाटील यांच्या प्रचारार्थ इंदापुरात गुरुवारी झालेल्या सभेत फडणवीस बोलत होते. महादेव मोहिते या अपक्ष उमेदवाराने पाटील यांना पाठिंबा दिला, तर प्रल्हाद भोंग यांनी भाजपात प्रवेश केला.

फडणवीस म्हणाले, ‘‘हर्षवर्धन पाटील यांनी मंत्रिमंडळात काम करताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका बजावली. त्यांना जनादेश द्या, इंदापूरचे पाण्यासह सर्व प्रश्न सोडविण्यास मदत करतो. सभेची गर्दी पाहता पाटील जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्‍याने विजयी होतील.’’ 

पाटील म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांचे कुलदैवत नीरा नरसिंहपूर येथे आहे. त्यामुळे आमदारही भाजपचा हवा, असे म्हणत महाजन यांनी तालुका पाण्यासाठी दत्तक घेतला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.

मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी पार पाडू.’’ या वेळी अप्पासाहेब जगदाळे, अशोक घोगरे, मारुतराव वणवे, तुकाराम काळे, रामभाऊ पाटील, नीलेश देवकर, संदीपान कडवळे, माऊली चौरे, नानासाहेब शेंडे, मुरलीधर निंबाळकर, पांडुरंग शिंदे, माऊली वाघमोडे, आकाश कांबळे, नितीन शिंदे आदींची भाषणे झाली. पद्मा भोसले, बाबासाहेब चवरे, लालासाहेब पवार, पृथ्वीराज जाचक, अविनाश घोलप, बाळासाहेब घोलप, अंकिता शहा, मुकुंद शहा आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 baramati devendra fadnavis politics