Vidhan Sabha 2019 : लीड नाही; तर पालिकेसाठी उमेदवारी नाही - बापट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

प्रत्येक यादीत लीड नाही मिळाला; तर महापालिकेची उमेदवारी विसरा. मी कोणतेही कारण ऐकून घेणार नाही, अशा शब्दांत खासदार गिरीश बापट यांनी पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना इशारा दिला. ‘हेडमास्तरां’नी उगारलेल्या छडीची चर्चा आज दिवसभर पक्षवर्तुळात रंगवून सांगितली जात होती.

विधानसभा 2019 : पुणे - प्रत्येक यादीत लीड नाही मिळाला; तर महापालिकेची उमेदवारी विसरा. मी कोणतेही कारण ऐकून घेणार नाही, अशा शब्दांत खासदार गिरीश बापट यांनी पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना इशारा दिला. ‘हेडमास्तरां’नी उगारलेल्या छडीची चर्चा आज दिवसभर पक्षवर्तुळात रंगवून सांगितली जात होती.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच मतदारसंघांत इच्छुकांची मोठी संख्या होती. पक्षाकडून उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतर अनेकांमध्ये नाराजी पसरली आहे. ती दूर करण्याचे प्रयत्न पक्षाकडून करण्यात आले; परंतु प्रचाराची सांगता होत आल्यानंतर अनेक नाराज अद्याप प्रचारात धडाडीने उतरल्याचे चित्र दिसत नाही. या पार्श्‍वभूमीवर नाराजी दूर करून, त्यांना प्रचारात आणण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचा एक भाग म्हणून काल रात्री खासदार बापट यांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

या वेळी काही पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांकडून विश्‍वासात घेतले जात नाही, खिशातील पैसा टाकावे लागत असल्याच्या तक्रारी केल्या. त्या वेळी खासदारांनी उमेदवारांनादेखील सुनावले. त्याचबरोबरच नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. ते म्हणाले, ‘‘माझी स्वतःची यंत्रणा आहे. कोण काम करत आहे, कोण करीत नाही याची माहिती माझ्याकडे आहे. याद राखा. प्रत्येक यादीत उमेदवाराला लीड मिळाले पाहिजे. महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देणे माझ्याच हातात आहे. तेव्हा मी कोणतीही कारण ऐकून घेणार नाही.’’ बापट हे पक्षातील ‘हेडमास्तर’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी छडी दाखविल्याने पक्षात दिवसभर हा चर्चेचा विषय झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 bjp lead municipal girish bapat politics