Vidhan Sabha 2019 : बोपखेल प्रचारासाठी उमेदवारांची दमछाक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

बोपखेल हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे गाव. तीन बाजूने लष्करी हद्द व एका बाजूला नदीमुळे बंदिस्त झालेले. गावात जाण्यासाठीचे दोन मार्ग. त्यापैकी एक दापोडीतील मार्ग लष्कराने चार वर्षांपूर्वी बंद केलेला. दुसरा दिघीमार्गे म्हणजे तब्बल २२ किलोमीटरचा वळसा असलेला, त्यामुळे तेथील मतदारांशी संपर्क साधताना विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची दमछाक होत आहे. काहींनी स्थानिक कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा सोपवली असून, काहींनी डिजिटलच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला आहे.

विधानसभा 2019 : बोपखेल हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे गाव. तीन बाजूने लष्करी हद्द व एका बाजूला नदीमुळे बंदिस्त झालेले. गावात जाण्यासाठीचे दोन मार्ग. त्यापैकी एक दापोडीतील मार्ग लष्कराने चार वर्षांपूर्वी बंद केलेला. दुसरा दिघीमार्गे म्हणजे तब्बल २२ किलोमीटरचा वळसा असलेला, त्यामुळे तेथील मतदारांशी संपर्क साधताना विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची दमछाक होत आहे. काहींनी स्थानिक कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा सोपवली असून, काहींनी डिजिटलच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला आहे.

बोपखेलला जाण्यासाठी दापोडीतील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) आवारातून रस्ता होता. केवळ पावणेतीन किलोमीटर अंतर होते. मात्र, चार वर्षांपूर्वी सीएमईने सार्वजनिक रहदारीसाठी हा रस्ता बंद केला. बोपखेलमधील प्रवेशद्वारही बंद केले आहे. त्यामुळे दापोडीतून बोपखेलला जाण्यासाठी फुगेवाडी, कासारवाडी, नाशिक फाटा, भोसरी, आळंदी रस्ता, दिघी, बोपखेल फाटामार्गे किंवा बोपोडी, खडकी बाजार, विश्रांतवाडी, कळस, बोपखेल फाटामार्गे जावे लागत आहे. दापोडीपासून हे अंतर साधारणतः २५ किलोमीटर आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात बोपखेलचा समावेश आहे. मात्र, अंतर जास्त असल्याने राजकीय पक्षांसह बहुतांश अपक्ष उमेदवार प्रचारासाठी गेलेच नाहीत. स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर तेथील जबाबदारी सोपवून डिजिटल माध्यमावर भर दिला आहे. या संदर्भात उमेदवाराच्या एका प्रचारप्रमुखाची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. ‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले, ‘‘बोपखेलला जाण्यासाठीचे अंतर जास्त आहे, त्यामुळे आम्ही तेथील बुथप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, मित्रपक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यामार्फत प्रचार यंत्रणा राबविली. मतदार यादीतील नावांनुसार संपर्क क्रमांक मिळविले. त्याद्वारे ऑडिओ, व्हिडिओ क्‍लिप व लिखित संदेश पाठवून प्रचार केला.’’ पदयात्रा, भित्तिपत्रके घरोघर वाटून मतदारांशी संपर्क साधल्याचे एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  

गुंतागुंतीची रचना
महापालिका निवडणुकीसाठी चार वर्षांपूर्वी बोपखेल व दापोडीचा समावेश प्रभाग ६४ मध्ये होता. मात्र, लष्कराने रस्ता बंद केल्याने व प्रभाग रचना बदलण्यात आल्याने बोपखेलचा समावेश आता प्रभाग चारमध्ये आणि दापोडीचा समावेश प्रभाग तीसमध्ये झाला आहे. प्रभाग चारमध्ये बोपखेलसह दिघीचा व प्रभाग तीसमध्ये दापोडीसह फुगेवाडी, कासारवाडीचा समावेश झाला आहे. मात्र, विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास बोपखेलचा समावेश पिंपरी मतदारसंघात आणि दिघीचा समावेश भोसरी मतदारसंघात आहे. त्यामुळे पिंपरीतील उमेदवारांना प्रचारासाठी बोपखेलला जाताना दापोडीपासून २५ किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे.

मतदार ७५००
केंद्र इमारत १
उमेदवार १८
मतदार भाग याद्या १२
मतदान केंद्र ९


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 bopkhel promotion candidate politics