Vidhan Sabha 2019 : चिंचवड, भोसरीतून ‘घड्याळ’ हद्दपार

NCP
NCP

विधानसभा 2019 : पिंपरी - राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी पिंपरी-चिंचवडची ओळख. मात्र, गेल्या पाच वर्षांत चित्र बदलले. महापालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. आता विधानसभा निवडणुकीत चिंचवड व भोसरी मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’ने थेट उमेदवार देण्याऐवजी पुरस्कृत केले. त्यामुळे पक्षाचे ‘घड्याळ’ चिन्ह दोन्ही मतदारसंघांतून हद्दपार झाले आहे. 

दिवंगत शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणजे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड. मात्र, १९९८-९९ मध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बंड केले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. तेव्हापासून महापालिकेवर ‘राष्ट्रवादी’चे प्राबल्य राहिले. त्यातील लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी पाच वर्षांपूर्वी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आणि चित्र पालटले. महापालिकेत भाजपची सत्ता आली. सध्या काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही, अशी स्थिती आहे.

आताच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या महिन्यात ‘राष्ट्रवादी’चे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काळेवाडीत बैठक घेतली. त्यात पिंपरी, चिंचवड व भोसरी या जागांवर हक्क सांगितला. त्यावर काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी किमान एक जागा काँग्रेसला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या जागावाटपात तीनही मतदारसंघ ‘राष्ट्रवादी’कडे गेले व काँग्रेसची उरली-सुरली अपेक्षाही संपुष्टात आली. ‘आम्हाला प्रचारात गृहीत धरू नये’, अशी मोघम भूमिका शहराध्यक्ष सचिन साठे यांनी मांडली.

दरम्यान, ‘राष्ट्रवादी’च्या हातीही काही लागले नाही. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांना चिंचवडमधून उमेदवारी मिळाली. मात्र, एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांना पुरस्कृत करण्याची वेळ आली. भोसरीतही शेवटच्या क्षणापर्यंत ‘राष्ट्रवादी’ने उमेदवारी जाहीर केलेली नव्हती. त्यामुळे बंडखोरी करीत माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.

अखेर त्यांनाच पुरस्कृत करण्याची वेळ पक्षावर आल्याने चिंचवड व भोसरीतून राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचा उमेदवार नसेन. पर्यायाने त्यांची ‘घड्याळ’ व ‘हात’ ही चिन्हेही नसतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com