Vidhansabha 2019 : इच्छुकांचे चित्त दिल्ली-मुंबईत!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयात शुकशुकाट होता. तेथे व्यवस्था पाहणारे दोन-चार कार्यकर्ते सोडले, तर कोणीही फिरकले नाही. सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारसंघात तयारीला लागले आहेत. इच्छुकांची अवस्था तर शरीराने मतदारसंघात आणि चित्त दिल्ली-मुंबईत, अशी अवस्था झाली आहे.

विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयात शुकशुकाट होता. तेथे व्यवस्था पाहणारे दोन-चार कार्यकर्ते सोडले, तर कोणीही फिरकले नाही. सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारसंघात तयारीला लागले आहेत. इच्छुकांची अवस्था तर शरीराने मतदारसंघात आणि चित्त दिल्ली-मुंबईत, अशी अवस्था झाली आहे. 

गेल्या चार- पाच दिवसांपासून विधानसभेची आचारसंहिता कधी लागणार, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. महाजनादेश यात्रा संपली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा झाला, तरीही आचारसंहिता लागली नव्हती. विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात यंत्रणा उभी करण्याचा, पक्षातील नेत्यांच्या भेटी घेऊन ‘सेटिंग’ लावण्याचा खटाटोप सुरू केला.

काँग्रेसच्या इच्छुक महिलांनी तर थेट दिल्ली गाठून उमेदवारी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर भाजपच्या जंगली महाराज रस्त्यावरील ‘सन्मान’ येथील पक्ष कार्यालयात महत्त्वाचे पदाधिकारी दुपारपर्यंत फिरकले नव्हते. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या दौऱ्याची तयारी करण्यात सर्व पदाधिकारी व्यग्र असल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सकाळी काँग्रेस भवन येथे एक चक्कर मारली, त्यानंतर तेदेखील त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीच्या व पक्षाच्या कामासाठी निघून गेले, असे तेथील कार्यकर्त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या कार्यालयातही गडबड नव्हती. डेक्कन येथील शिवसेना भवन व नारायण पेठेतील मनसेच्या कार्यालयात शुकशुकाट होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Interested Candidate Politics