Vidhan Sabha 2019 : कसबा मतदारसंघात ‘महिलाराज’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

नवमतदारांचा कौल महत्त्वाचा 
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत तरुण नवमतदारांची संख्या वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत १८ ते १९ वयोगटातील तरुण मतदारांची संख्या एक लाख २० हजार ८९३ इतकी असल्याने नवमतदारांच्या मतांचा कौलही महत्त्वाचा ठरणार आहे.

विधानसभा 2019 : पुणे - जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत सर्वाधिक पाच लाखांहून जास्त मतदार चिंचवड आणि हडपसर या दोन मतदारसंघांमध्ये आहेत; तर कसबा पेठ मतदारसंघात महिला मतदारांचे प्रमाण अधिक असून, हे प्रमाण एक हजार पुरुषांमागे एक हजार १७ इतके आहे.

निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची अंतिम यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानुसार २१ मतदारसंघांत एकूण मतदार ७७ लाख २९ हजार २१७ आहेत. त्यात पुरुष मतदार ४० लाख ४२ हजार ८९ असून, महिलांचे प्रमाण ३६ लाख ८६ हजार ८८५ आहे. तृतीयपंथी मतदारांची संख्या २४३ एवढी आहे.  

जिल्ह्यात एकूण मतदारांच्या तुलनेत एक हजार पुरुषांमागे महिलांचे प्रमाण ९१२ एवढे आहे. भोसरी मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत सर्वांत कमी महिला मतदार आहेत. तिथे एक हजार पुरुषांमागे ८२६ महिला मतदार आहेत. त्यापाठोपाठ चिंचवड मतदारसंघात ८७६, खडकवासला ८७९; तसेच भोर आणि हडपसर मतदारसंघात हे प्रमाण ८९० इतके आहे.  

जिल्ह्यात चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक पाच लाख १८ हजार ३०९ मतदार आहेत. हडपसर मतदारसंघात पाच लाख चार हजार ४४ मतदार आहेत. सर्वांत कमी म्हणजे दोन लाख ८३ हजार ५३१ मतदार आंबेगाव मतदारसंघात आहेत. कसबा मतदारसंघात एकूण दोन लाख ९० हजार ६८३ मतदार आहेत. त्यात एक लाख ४४ हजार १२७ पुरुष असून, महिला मतदारांची संख्या एक लाख ४६ हजार ५५२ इतकी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 kasaba Constituency women politics