Vidhan Sabha 2019 : लुटारूंकडून पैसा वसूल करणारच - नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

पुण्याबद्दल म्हणाले...... 

  • विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याने मला, भाजपला भरभरून दिले आहे. पुणेकरांनी लोकसभा, विधानसभा, महापालिकेला भरपूर आशीर्वाद दिले आहेत म्हणून पुण्याला माझे नमन  
  • देशाचे राजकारण, ध्येय-धोरणांची चिकित्सा पुण्यामध्ये होते. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम महाराज यांच्यासारखे संत, महात्मा जोतिबा- सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, लोकमान्य टिळक यांच्यासारखे सुधारक, सुखदेव- राजगुरू, उमाजी नाईक यांसारख्या क्रांतिकारकांच्या पदस्पर्शाने पुणे पावन झाले आहे 
  • पुणे हे कायमच प्रागतिक शहर ठरले आहे. विज्ञान- तंत्रज्ञानाचा अंगीकार येथे लवकर होतो. माहिती तंत्रज्ञानाबरोबरच स्टार्टअपचे इनक्‍युबेशन सेंटर, अशीही या शहराची ओळख आहे 
  • संस्कृतीबरोबरच स्टार्टअप हब, ‘स्किल एज्युकेशन’चेही हे शहर आहे 
  • पुण्यासाठी ‘कनेक्‍टिव्हिटी’ सशक्त करीत आहोत. मेट्रोचे विस्तारीकरण होईल. पुणे- पंढरपूर रस्त्यावर पालखी महामार्ग लवकर पूर्ण होणार. पुण्यासह नऊ शहरे ‘उडान’ अंतर्गत जोडली जात आहेत 

विधानसभा 2019 : पुणे - लोकसभेच्या मागच्या कार्यकाळात जनतेचे पैसे लुटणाऱ्यांना तुरुंगापर्यंत आणले होते. या कार्यकाळात काय सुरू आहे ते तुम्ही पाहत आहातच... दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेकांचे ‘नंबर’ त्यात आहेत. हा ‘सिलसिला’ येथेच थांबणार नाही. यापूर्वी ज्यांनी ज्यांनी लुटले, त्यांच्याकडून जनतेचे पैसे वसूल केल्याशिवाय हा सेवक शांत बसणार नाही, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथील जाहीर सभेत केला. तसेच, लोकमान्य टिळक यांनी ‘स्वराज्य’ची घोषणा पुण्यात केली अन्‌ येथूनच आपणाला ‘सुराज्य’ घडवायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. या सभेला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायंकाळी सहा वाजून १२ मिनिटांनी मोदींचे सभास्थानी आगमन झाले. मराठीतून भाषणाला सुरवात करीत सुमारे ३१ मिनिटे त्यांनी पुणेकरांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील बहुतांश सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या मोदींनी त्यांच्याबद्दल या सभेत अवाक्षरही 

उच्चारले नाही. भाषणादरम्यान कलम ३७०च्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी पुढे येऊन लवून नमस्कार केला; तर घोषणा देत, प्रतिसाद मागत सभेतील उपस्थितांना बोलते केले.

या प्रसंगी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार अमर साबळे, संजय काकडे, आमदार दिलीप कांबळे, मेधा कुलकर्णी, माजी खासदार अनिल शिरोळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे, शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, सुनील कांबळे, मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, लक्ष्मण जगताप आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मोदी म्हणाले, ‘‘नवे केंद्र सरकार पाच वर्षांसाठी निवडले आहे. त्याला अजून पाच महिनेही झाले नाहीत. या काळात नागरिक नव्या भारताचा अनुभव घेत आहेत. जम्मू-काश्‍मीर आणि लडाखचा विकास करताना ‘कलम ३७०’चा अडथळा होता. तो दूर करण्याची चर्चा खूप झाली. परंतु, त्याचे धाडस भाजप सरकारने दाखविले. त्याचे कारण भारतीयांनी बहुमताने दिलेला जनादेश हेच आहे.’’

भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनकडे वाटचाल करीत आहे. स्टार्टअप आणि कौशल्यविकासामुळे युवकांना प्रचंड संधी मिळणार आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि नव्या भारताची वाटचाल सुलभ होईल. देशात मोठ्या प्रमाणावर परकी गुंतवणूक होत आहे. कॉर्पोरेट टॅक्‍समध्ये सवलत दिल्यामुळे उद्योग-व्यवसाय विस्तारतील. पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकार १०० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. जगातील कोणताही नेता हस्तांदोलन करतो, तो देशातील १३० कोटी नागरिकांचा जनादेश असल्यामुळेच. आता आपल्यावर कोणी डोळे वटारू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत खूप चांगल्या पद्धतीने विकासकामे सुरू केली आहेत, असेही मोदी यांनी स्पष्ट केले. शहर भाजपचे सरचिटणीस उज्ज्वल केसकर यांनी सूत्रसंचालन केले.

लोकसभेपेक्षा जास्त मतदान करा
मतदान २१ ऑक्‍टोबर रोजी सोमवारी आहे. आदल्या दिवशी रविवारची सुटी आहे. मतदानाच्या दिवशी अनेकांना सुट्या मिळाल्या आहेत. त्यामुळे जोडून आलेल्या सुट्यांमुळे महाबळेश्‍वर, गोव्याला जाण्याचे नियोजन करू नका; तर मतदानाचे पवित्र कर्तव्य न विसरता पार पाडा. लोकसभेपेक्षा जास्त मतदान या वेळी झाले पाहिजे, असे आवाहनही मोदी यांनी अखेरीस केले.

सावरकरांना भारतरत्न हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही. मंदीसारख्या विषयांवर बोलू नये म्हणून केलेला हा चुनावी जुमला आहे. सावरकरांना भारतरत्न देणे हा हुतात्मा भगतसिंग यांचा अवमान आहे.
- कन्हैयाकुमार, ‘जेएनयू’तील माजी विद्यार्थी नेते
नगर येथील सभेत

बीड जिल्ह्यातील परळी या मतदारसंघात काही खरे नाही अशा प्रकारची अफवा सर्वत्र पसरविली जात आहे. यामध्ये काहीही तथ्य नाही. काँग्रेस, ‘राष्ट्रवादी’ने जातीपातीचेच राजकारण केले.
- पंकजा मुंडे, भाजप नेत्या
पाथर्डी येथील सभेत

तुम्ही त्यांना दोनदा संधी दिली त्यांनी काहीच केले नाही,  येत्या पाच वर्षांत महायुती शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करेल. आम्ही लोकांमध्ये असून लोकांसाठी लढत आहोत. 
- आदित्य ठाकरे, युवासेनेचे नेते
नांदगाव येथील सभेत

राष्ट्रवादीने मला विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिली होती. ‘राष्ट्रवादी’चे काही नेते उमेदवारी फॉर्म घेऊन माझ्या घरी आले होते. माझ्यावर अन्याय झाला हे खरे असून, याबाबत मी पक्षाकडे विचारणाही करणार आहे.
- एकनाथ खडसे, भाजपचे ज्येष्ठ नेते
भुसावळ येथील सभेत

राज्यातील जनतेने या दळभद्री, गैरव्यवहार करणाऱ्या सरकारला बाजूला सारायला हवे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्यानंतर तीन महिन्यांमध्ये आम्ही सातबारा कोरा करू.
- अजित पवार, ‘राष्ट्रवादी’चे नेते
सोलापूर येथील सभेत

मुंबई शहरासह उपनगरांमध्ये मेट्रोची कामे सुरू असून, यासाठी स्थानिकांचे स्थलांतर घडवून आणले जात आहे. मुंबईतील मेट्रो सेवा ही मराठी माणसाचा घात करेल.
- राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
मुंबईतील प्रभादेवी येथील सभेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 narendra modi speech politics