फक्त तीस दिवस आणि पुढची पाच वर्षे!

फक्त तीस दिवस आणि पुढची पाच वर्षे!

‘सत्तर मिनिट... सत्तर मिनिट हैं तुम्हारे पास. शायद तुम्हारी जिंदगी के सबसे खास सत्तर मिनिट... आज तुम अच्छा खेलो या बुरा, ये सत्तर मिनिट तुम्हे जिंदगी भर याद रहेंगे...’ ‘चक दे इंडिया’ या चित्रपटात विश्‍वचषकापासून एक सामना दूर असणाऱ्या स्वतःच्या टीमला उद्देशून असणारा शाहरुखचा हा डायलॉग. खरेतर आचारसंहितेनंतर सर्वच राजकीय पक्षांना लागू होतो.

सत्तर मिनिटांऐवजी ‘तीस दिन हैं तुम्हारे पास’ इतकाच काय तो बदल! निवडणूक आपल्याच खिशात आहे, अशा थाटात वावरणारा सत्ताधारी पक्ष, सत्तेचे ‘गाजर’ पाहून पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांमुळे चिंतेत असणारे विरोधी पक्ष आणि जिंकण्यापेक्षाही कोणाला तरी पाडण्यासाठी निर्माण होऊ पाहणारी तिसरी आघाडी, असे यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे चित्र आहे. यात मतदार मात्र ‘थर्ड अम्पायर’सारखा शांतपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

निवडणुकीच्या रणधुमाळीला आजपासून सुरवात झाली. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून खूप पाणी वाहून गेले. या पाच वर्षांत सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने आपला विस्तार केला, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे बिनीचे सरदार पक्ष सोडून गेल्याने या पक्षांचे अनेक बुरूज ढासळले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

ज्या ठिकाणी विरोधी पक्ष मजबूत होता, तेथे पक्षांतर घडवून आणण्यात आले. त्यामुळे सर्वाधिक पक्षांतरानंतरची विधानसभा, अशीही या निवडणुकीची ओळख राहील. प्रश्‍न आहे तो, पक्षांतर केलेल्या नेत्यांना मतदार किती स्वीकारतात याचा.

या विधानसभेसाठी राज्याचे सर्वाधिक लक्ष लागले आहे ते पुणे जिल्ह्याकडे. पुणे हा शरद पवार यांचा जिल्हा. राज्यात काँग्रेसची दाणादाण उडविल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा द्यायचा असेल, तर पश्‍चिम महाराष्ट्रात विशेषतः पुणे जिल्ह्यावर ताकदीनिशी हल्ला चढवा, हे भाजपचे धोरण. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही पुणे जिल्ह्याभोवती राजकारण फिरत राहणार, हे वेगळे सांगायला नको.

जिल्ह्यातील २१ जागांपैकी सध्या सर्वाधिक १२ आणि रासपची एक, अशा १३ जागा भाजपकडे आहेत. शिवसेनेकडे चार, राष्ट्रवादीकडे तीन, तर काँग्रेसकडे एक जागा, असे बलाबल. लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड मतदारसंघात भाजप-सेनेने आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. शिरूरची लोकसभेची जागा राष्ट्रवादीने जिंकल्याने विधानसभेसाठी जिल्ह्यात आणखी तीन-चार जागा जिंकण्याची आशा राष्ट्रवादी काँग्रेसला निर्माण झाली आहे. नेमक्‍या याच कारणामुळे भाजपला पुणे जिल्ह्यातील लढाई सोपी वाटत नाही. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील हे एकच नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. पण, त्यांनाही विधानसभेत जाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. पुणे शहरातील आठ जागा टिकवून ठेवण्यासाठी भाजपला कष्ट घ्यावे लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे आकडे, नगरसेवकांची संख्या, अशा अनेक गोष्टी भाजपच्या बाजूने दिसत असल्या; तरी अगदी कसबा, शिवाजीनगर, हडपसर, पुणे कॅंटोन्मेंट या मतदारसंघात विरोधक भाजपचा घाम काढू शकतात. प्रश्‍न आहे तो विरोधक किती आत्मविश्‍वासाने लढतात याचा.

बरोबर तीस दिवसांनंतर मतदारांनी मतदानयंत्रावरील बटन दाबलेले असेल. हे बटन आपल्या पक्षाचे असावे, यासाठी मात्र सर्वच पक्षांना जिवाचे रान करावे लागणार. विजयाचा कितीही आत्मविश्‍वास असला, तरी मतदारांना पुन्हा एकदा आपली भूमिका पटवून द्यावी लागणार. आरोप-प्रत्यारोप, जाहीरनामे, जनसंपर्क आणि महत्त्वाचे पक्षाचे नेतृत्व, याचा विचार मतदार नावाचा ‘थर्ड अम्पायर’ करणार आणि दिवाळीत फटाके उडविण्याची संधी कोणाला द्यायची? हे ठरविणार. म्हणूनच, महत्त्वाचे आहेत ते फक्त हे तीस दिवस...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com