esakal | Vidhan Sabha 2019 : रणांगणही तेच; अन्‌ योद्धेही तेच
sakal

बोलून बातमी शोधा

Yuti-Aghadi

विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज माघारीनंतर शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले. पिंपरीत सर्वाधिक बंडखोर होते, त्यामुळे बहुरंगी लढत होईल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, सर्वच बंडखोरांनी माघार घेतल्याने दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले. तर, चिंचवड व भोसरीतही दुरंगी लढतीचेच चित्र आहे. तीनही मतदारसंघांतून २०१४ च्या निवडणुकीतील निकटचे प्रतिस्पर्धीच पुन्हा एकमेकांविरोधात रिंगणात उरले आहेत.

Vidhan Sabha 2019 : रणांगणही तेच; अन्‌ योद्धेही तेच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पिंपरी - विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज माघारीनंतर शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले. पिंपरीत सर्वाधिक बंडखोर होते, त्यामुळे बहुरंगी लढत होईल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, सर्वच बंडखोरांनी माघार घेतल्याने दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले. तर, चिंचवड व भोसरीतही दुरंगी लढतीचेच चित्र आहे. तीनही मतदारसंघांतून २०१४ च्या निवडणुकीतील निकटचे प्रतिस्पर्धीच पुन्हा एकमेकांविरोधात रिंगणात उरले आहेत.

चाबुकस्वार विरुद्ध बनसोडे
पिंपरी मतदारसंघातून ३१ पैकी १३ जणांनी माघार घेतली. त्यामुळे १८ जण रिंगणात राहिले आहेत. माघार घेणाऱ्यांत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांच्या सर्वच बंडखोरांचा समावेश आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे महायुतीकडून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार आणि महाआघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांच्यात लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले.

जगताप विरुद्ध कलाटे
चिंचवड मतदारसंघातून १९ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील पाच जणांचे अर्ज बाद झाले होते. उरलेल्या १४ पैकी  तीन जणांनी माघार घेतली. महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत शितोळे यांचा अर्ज पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने बाद झाला होता. त्यामुळे पक्षाने महायुतीतील शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांना पुरस्कृत केले. त्यांची लढत महायुतीकडून रिंगणात उतरलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्याशीच होणार आहे.

लांडगे विरुद्ध लांडे
भोसरी मतदारसंघातून वीस जणांनी अर्ज दाखल केले होते. दोघांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे रिंगणात राहिलेल्या १८ पैकी सहा जणांनी माघार घेतली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर दत्ता साने व माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांचाही समावेश आहे. त्यामुळे बारा जण रिंगणात राहिले आहेत. राष्ट्रवादीने अपक्ष विलास लांडे यांना पुरस्कृत केले आहे. त्यांचा सामना महायुतीतील भाजपचे महेश लांडगे यांच्याशी होणार असल्याचे स्पष्ट झाले.

तेच उमेदवार एकमेकांसमोर
पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघांत विधानसभा निवडणूक लढतींबाबत २०१४ च्या लढतींच्या पुनरावृत्ती झाली आहे. त्या वेळी पिंपरीत शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार व राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांच्यात लढत झाली होती. चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप व शिवसेनेचे राहुल कलाटे प्रतिस्पर्धी होते. भोसरीत अपक्ष महेश लांडगे व राष्ट्रवादीचे विलास लांडे आमने-सामने होते. कलाटे यांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीने त्यांना पुरस्कृत केले आहे. तर, लांडगे भाजपचे उमेदवार असून, लांडे यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केले आहे.