Vidhan Sabha 2019 : तोफा आज थंडावणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

वडगावात यंत्रणा सज्ज
वडगाव मावळ - मावळ विधानसभा मतदारसंघात सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कर्मचाऱ्यांना रविवारी (ता. २०) सकाळी मतदान यंत्रे व इतर साहित्याचे वाटप केले जाणार आहे. त्याची व्यवस्था तळेगावात नूतन महाराष्ट्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे केली आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट सीलबंद करून पोलिस बंदोबस्तात स्ट्राँगरूमध्ये ठेवली आहेत. निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना संबंधित केंद्रांवर पोचविण्यासाठी ४८ एसटी बस, २२ मिनीबस, २८ जीप आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी ४० जीप गाड्यांची व्यवस्था केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष भागडे यांनी दिली.

विधानसभा 2019 : पिंपरी - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता शनिवारी (ता. १९) सायंकाळी सात वाजता होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरीसह लगतच्या मावळ मतदारसंघातील उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी शुक्रवारी मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला. पदयात्रा, कोपरा सभा, बैठका घेतल्या. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले.

विधानसभेसाठी सोमवारी (ता. २१) सकाळी सातपासून मतदानाला सुरवात होणार आहे. त्यापूर्वी ४८ तास अगोदर उमेदवारांना प्रचार थांबवावा लागतो. त्यानंतर प्रचार करताना किंवा मतदारांना कोणतेही आमिष दाखवताना उमेदवार अथवा त्यांचा कार्यकर्ता आढळल्यास आचारसंहिता भंगाचा गुन्हा होता. त्यामुळे प्रचारासाठी उरलेल्या काही तासांत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरू आहे. चारही मतदारसंघांतील उमेदवार व त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी स्वतंत्रपणे ठिकठिकाणी कोपरा सभा घेतल्या. पदयात्रा काढून मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. प्रचार पत्रकांचे वाटप केले. काहींनी वेगवेगळ्या समाजाचे मेळावे, बैठकी घेऊन पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला. सध्या काकडआरती सुरू आहे. शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी मशिदींमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने असतात, या पार्श्‍वभूमीवर काही उमेदवारांनी धार्मिक स्थळांच्या बाहेर थांबून तर काहींनी कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर थांबून मतदारांना साकडे घातले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 publicity stop politics