Vidhan Sabha 2019 : त्यांना हटवा अन्‌ शिवसेना वाचवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

एकीकडे विधानसभा निवडणुकीत रंग भरू लागला असताना, दुसरीकडे मात्र शहर शिवसेनेमध्ये एका नेत्याचे किस्से चर्चेचा विषय ठरत आहे. अशा या नेत्याच्या तक्रारी अनेकांनी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालून ‘शिवसेना वाचवा’ अशी हाक दिली आहे.

विधानसभा 2019 : पुणे - एकीकडे विधानसभा निवडणुकीत रंग भरू लागला असताना, दुसरीकडे मात्र शहर शिवसेनेमध्ये एका नेत्याचे किस्से चर्चेचा विषय ठरत आहे. अशा या नेत्याच्या तक्रारी अनेकांनी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालून ‘शिवसेना वाचवा’ अशी हाक दिली आहे.

आश्‍वासन देणे, त्याच्या बदल्यात मलई घेणे, रात्रीच्या वेळेस पबमध्ये तळ ठोकून बसणे असे या नेत्याचे अनेक किस्से सध्या शहर शिवसेनेमध्ये चर्चिले जात आहेत. शहर व जिल्ह्यात पक्षवाढीसाठी काम करण्याऐवजी वैयक्तिक ‘संपर्क’ आणि ‘माया’ जमविण्यावरच या नेत्याने भर दिल्याने ‘त्यांना हटवा आणि शहर शिवसेना वाचवा’ अशी मोहीम सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली; मात्र या नेत्याला पक्षाच्या बैठका, निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी वेळ नाही, त्यामुळे शहर पातळीवर पक्षाचे काम ठप्प पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्ये नुकतीच निवडणूक झाली, यातही या नेत्याने घोळ घातला. त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराला चिन्ह मिळू शकले नाही. परिणामी, पक्षाला नामुष्की पत्करावी लागली. त्या वेळी या नेत्याने घातलेल्या घोळाची माहिती जिल्ह्यातील राज्यमंत्र्यांनी थेट पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली.
तसेच, लोकसभा निवडणुकीतही त्याने केलेल्या ‘उद्योगां’च्या तक्रारी पक्षश्रेष्ठींच्या कानावर गेल्या आहेत. मध्यंतरी पक्षाच्या काही माननीयांना घेऊन या नेत्याने थेट महापालिकेतील एका अधिकाऱ्याला गाठले. ‘पक्षाला मदतीची गरज आहे, तुम्ही मध्यस्थी करा,’ असा विनंती वजा आदेशही त्याने दिला होता. 

पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना ‘तुमच्यावर माझी कृपा आहे,’ असे भासवून त्यांच्याकडून ‘माया’ उकळली असल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. एकूणच शहर शिवसेनेमध्ये निवडणुकीपेक्षा या नेत्याच्या किश्‍शांवरच अधिक चर्चा सुरू आहे. परंतु, पक्षाच्या आणखीन एका दिल्लीतील नेत्याच्या मर्जीतला हा नेता आहे, त्यामुळे त्याच्या विरोधात कोणीही उघड बोलण्यास तयार नाही. 

परंतु, या चर्चेची आणि तक्रारींची दखल घेऊन संबंधित नेत्याची उचलबांगडी होणार का, असा प्रश्‍न सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Shivsena Comment Politics