कोरोनानंतर आता महाराष्ट्राला सगळ्यांत मोठी संधी; सांगतायत डॉ. अमोल कोल्हे

डॉ. अमोल कोल्हे, खासदार
Thursday, 11 June 2020

गडकोट संवर्धन आणि ऐतिहासिक पर्यटनाला प्रोत्साहन 
आपण नेहमी अभिमानाने म्हणतो, की देशातील इतर राज्यांना भूगोल आहे; परंतु महाराष्ट्राला देदीप्यमान इतिहास आहे. इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा! आणि छत्रपतींच्या देदीप्यमान इतिहासाचे खरेखुरे साक्षीदार आजही निधड्या छातीने महाराष्ट्रात उभे आहेत, ते म्हणजे गडकोट! ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, अस्मितेचा विषय आहेत. अनेक दुर्गप्रेमी संघटना या गडकोटांच्या संवर्धनासाठी, स्वच्छतेसाठी कार्यरत आहेत; परंतु गडकोट केवळ अस्मितेचा विषय न राहता त्यांचे पावित्र्य राखून संवर्धन, जीवसृष्टीचे जतन, गडकोट पर्यटनाला चालना आणि त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार या चतुःसूत्रीचा अवलंब केल्यास फार मोठ्या संधी उपलब्ध होतील, त्यासाठी गडकोटांच्या पायथ्याशी पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्याबरोबरच वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देणेही गरजेचे आहे.

महाराष्ट्राच्या बलस्थानांच्या अनुषंगाने राज्याचे पर्यटन धोरण आखणे सयुक्तिक ठरेल. नैसर्गिक, सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध परंपरेबरोबरच दळणवळणाच्या सुविधा, कायदा व सुव्यवस्थेमुळे पर्यटकांच्या मनातील सुरक्षितता; कृषी, औद्योगिक, मनोरंजन अशा क्षेत्रांतील प्रगती आणि मराठी जनमानसात असणारी आदरातिथ्याची भावना व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने बलस्थानेच आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

धार्मिक पर्यटनातून चालना 
धार्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर ही तीर्थक्षेत्रे आहेत, अष्टविनायक आहेत; कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड, सप्तशृंगी गड ही साडेतीन शक्तिपीठे आहेत. श्रीक्षेत्र पंढरपूर, श्रीक्षेत्र शिर्डी, मुंबईचा सिद्धिविनायक ही धार्मिक पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाची देवस्थाने आहेत. शीख बांधवांसाठी महत्त्वाचा नांदेडचा गुरुद्वारा आहे. प्रत्येक जिल्ह्यात आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेतच. त्यांना भेट देणाऱ्या भाविकांच्या भावनेचा आदर ठेवून कळत-नकळत या धार्मिक पर्यटनाचा एकूण व्यवसायाला कसा हातभार लागतो, याचे चौकस विवेचन आवश्‍यक आहे. तळकोकणातील भराडीदेवीच्या जत्रेला होणारी आर्थिक उलाढाल आणि स्थानिकांना मिळणारा रोजगार हे बोलके उदाहरण आहे. शिर्डीतील हॉटेल व्यवसाय आणि थीम पार्क धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून विरंगुळा पर्यटनाला चालना देण्याचे उत्तम उदाहरण आहे. धार्मिक पर्यटनासाठी येणारा भाविक इतर पर्यटनालाही चालना देऊ शकतो; मात्र हे करताना भाविकांच्या भावनांचा आदर होणे आणि ‘बाजारू’ वृत्तीला आळा घालण्याचा विचार झाला पाहिजे. महाराष्ट्राला समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे. कुंभमेळा हे आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षण ठरते, तसेच वारकरी संप्रदायाचा दिंडी सोहळा, त्यातील नियोजन, शिस्तबद्धता, सहजीवनाचा आदर्श वस्तुपाठ हे आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकतात, त्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर बोलबाला होणे गरजेचे आहे. यामध्ये प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरेल. 

दोन मुलींच्या अपघातातील पसार टँकर चालकास कसे पकडले?; वाचा सविस्तर

बदलती अभिरुचीही ओळखा 
आजकाल पर्यटकांना पर्यटनस्थळे पाहण्याबरोबरच अनुभव आणि त्याची स्टोरीही हवी असते. येथे खाद्य व लोककला संस्कृती महत्त्वाची भूमिका वठवू शकतात. खाद्यसंस्कृतीमध्ये मासवडी, शेंगोळी, पुरणपोळी, मिसळ, कढीवडा अशी खासीयत पर्यटकांना वेगळे समाधान देऊ शकते. लोककलांमधील गोंधळ, भारूड, कीर्तन, शाहिरी परंपरा, तमाशा, आदिवासी बांधवांचे तारपा नृत्य या आणि अशा अनेकांचा अंतर्भाव पर्यटन धोरणात केल्यास या लोककलावंतांना हक्काचा रोजगार मिळेल, त्याचबरोबर देश-विदेशांतील पर्यटकांनाही आगळा अनुभव ठरेल. तसेच, ‘बारा बलुतेदार’ या ग्रामीण जीवनपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल, अशा रिसॉर्टची संकल्पनाही राबविता येईल. यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक आकर्षित होतीलच; परंतु शहरी तरुणाईलासुद्धा हा "Going back to the roots` असा अनुभव असेल. सध्या अनेक तरुण शेतकरी कृषी पर्यटनाचे स्तुत्य उपक्रम राबवित आहेत. या होतकरू तरुणांना प्रचार-प्रसारासाठी मोठे व्यासपीठ निर्माण करून देणे हेदेखील पहिले पाऊल ठरेल. देशातीलच नव्हे तर परदेशांतील पर्यटकांसाठाही आकर्षणबिंदू ठरू शकेल आणि ती गोष्ट म्हणजे ‘बैलगाडा शर्यत’. या विषयावर मतमतांतरे आहेत आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे; परंतु ग्रामीण अर्थचक्राला गती देण्यासाठी, पर्यटकांच्या आकर्षणासाठी, नियमांच्या अधीन राहून आयोजित केलेली बैलगाडा शर्यत मैलाचा दगड ठरू शकेल, ही भूमिका मी वारंवार संसदेत मांडलेली आहे. 

औंधमध्ये मुलगा व वडिल दोघेही...

साहसी खेळांना व्यावसायिक दर्जा 
महाराष्ट्राचे आणखी एक बलस्थान म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगा. गिर्यारोहण, प्रस्तरारोहण, रॅपलिंग, ट्रेकिंग यांची आवड असणारी तरुणाई महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे; परंतु बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना या साहसी खेळांत समाविष्ट करून घेणे आणि या खेळांना व्यावसायिक दर्जा आणि व्यासपीठ देणे गरजेचे आहे. रोह्यामध्ये रिव्हर राफ्टिंगला मिळणारा तरुणाईचा प्रतिसाद पाहिल्यास साहसी खेळांच्या पर्यटन क्षमतेचा अंदाज येईल. याव्यतिरिक्त पॅरासेलिंग, पॅराग्लाइडिंग, हॉट एअर बलून अशा खेळांसाठीदेखील योग्य प्रशिक्षण व शासकीय पातळीवर प्रोत्साहनपर धोरणाची आवश्यकता आहे. यात ‘शिवकालीन खेळां’चाही समावेश नक्की होऊ शकतो. आज महाराष्ट्रात लाठीकाठी, तलवार, दांडपट्टा अशा खेळांत प्रावीण्य असणारी अनेक मंडळी आहेत; परंतु केरळच्या ‘कलारीपट्टू’प्रमाणे व्यासपीठ या खेळांना नाही, ते मिळवून देऊन या शिवकालीन खेळांचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. 

चित्रनगरी, पर्यटनाला एकत्र चालना 
महाराष्ट्रातील मनोरंजनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणजे मुंबई! कोरोनाच्या संकटाने मुंबईव्यतिरिक्तही चित्रनगरी असावी, ही बाब अधोरेखित झाली आहे. आज पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चित्रीकरण होते; परंतु सुसज्ज चित्रनगरीची वानवा आहे. सध्या कोल्हापुरात चित्रनगरीच्या सुसज्जतेचे प्रयत्न सुरू आहेत; त्याचबरोबर जुन्नर तालुक्‍यातही चित्रनगरी उभी राहिली आणि तिचा पर्यटन धोरणात समावेश झाल्यास दोन व्यवसाय हातात हात घालून उभे राहण्याचे उदाहरण घालून देता येईल. मला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेदरम्यान फोन आले, की आमच्या भागात गडकोटांवरील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. म्हणजेच, एखाद्या गोष्टीचे आकर्षण इतर माध्यमांतूनही निर्माण होऊ शकते. यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर साहित्य, कला या माध्यमांतून महाराजांची थोरवी उच्चरवाने सांगणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे. प्रामाणिकपणे कोणाच्याही भावना न दुखावता हे कबूल करावे लागेल, ‘काही बाबतीत जगात नखभर कर्तृत्व असणाऱ्या राजांची हातभर थोरवी सांगितली जाते; पण आभाळभर कर्तृत्व असणाऱ्या आपल्या छत्रपतींची थोरवी सांगण्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण अजून कमी पडतो.’ या गोष्टींचा अंतर्मुख होऊन विचार झाला पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtras strengths should be considered in tourism policy