महर्षी कर्वे यांचे स्मारक ‘अदृश्‍य’

विनायक बेदरकर
बुधवार, 13 मार्च 2019

कोथरूड - भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्मारकाचे अनावरण होऊन आठवडा उलटत नाहीत. अशातच पुणे महापालिकेनेच कर्वे स्मारक चौकात चुकीच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावला आहे. यामुळे कर्वे यांचे स्मारक झाकले गेले आहे.

कोथरूड - भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्मारकाचे अनावरण होऊन आठवडा उलटत नाहीत. अशातच पुणे महापालिकेनेच कर्वे स्मारक चौकात चुकीच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावला आहे. यामुळे कर्वे यांचे स्मारक झाकले गेले आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मंगळवारी दुपारी नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय तरतूदीमधून कोथरूडमधील कर्वे स्मारक चौकात चुकीच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आला. यामुळे स्मारक दिसेनासे झाले आहे. दोन वर्षांपासून रखडलेल्या महर्षी कर्वे यांच्या स्मारकाचे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते ६ मार्च रोजी अनावरण झाले. स्मारकाच्या अनावरणापूर्वी पालिकेने या चौकातील विद्रूपीकरण ठरणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या दूर करीत चौक सुशोभित केला होता. चुकीचे दिशादर्शक फलक लावल्यामुळे स्मारक दृष्टीस पडत नाही. त्यामुळे फलक हटविण्याची मागणी होत आहे.

महर्षी कर्वे यांचे स्मारक या दिशादर्शक फलकामुळे झाकले जात आहे. तसेच, या फलकाचा नागरिकांनाही फायदा नाही. डेक्कनकडून येणाऱ्या वाहनचालकाला सिग्नल ओलांडून पुढे आल्यावर हा फलक नजरेस जाईल. वास्तविक पाहता हा फलक चौकातून हटवून चौकापूर्वी लावल्यास त्याचा उपयोग होईल. तसेच, स्मारकालाही याचा अडथळा होणार नाही.
- अतुल कुलकर्णी, नागरिक, कोथरूड

आज फलक लावण्यात आला असल्यास तो तातडीने काढण्यात येईल. तसेच दिशादर्शक फलकावरील नगरसेवकांच्या नावावर पट्ट्या लावण्यात आल्या आहेत.  
- शिशिर बहुलीकर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त 

Web Title: Maharshi Karve Monument