राबणाऱ्या हातांना सन्मानाने जगायला शिकवणाऱ्या मुंबईची ओळख करून दिली ती महात्मा फुलेंनी

स्थलांतर हा विषय मानवी संस्कृतीला नवीन नसला तरी स्थलांतर स्वखुषीने कधीच होत नाही, झाले नाही
mahatma jyotirao phule Social inequality different reasons for the migration to India
mahatma jyotirao phule Social inequality different reasons for the migration to Indiaesakal

- राजाराम सूर्यवंशी

स्थलांतर हा विषय मानवी संस्कृतीला नवीन नसला तरी स्थलांतर स्वखुषीने कधीच होत नाही, झाले नाही. आपण जागतिक स्तरावरील स्थलांतरांचा अभ्यास केल्यावर आपल्याला जाणवते की ,जास्त करून झालेली स्थलांतरेही प्राकृतिक वा पर्यावरणीय बदलांमुळे वा प्राकृतिक विपदांमुळे घडून आलेली होती.

भारतात होणाऱ्या स्थलांतराला मात्र भिन्नही कारणे होती. त्यात प्रामुख्याने प्राकृतिक आपदा, हे तर होतेच. मात्र,भौगौलिक विकासाचा असमतोल हे प्रधान कारण असले तरी, त्याहीपेक्षा महत्वाचे तिसरे कारण म्हणजे जातिव्यवस्था, जी जगाच्या पाठीवर एकमेवद्वितीय आहे.

आणि भारतीय हिंदूधर्मप्रणित नियमांनी व अनुषंगाने येणारी सामाजिकस्तरीय विषमता. आणि ही विषमता खुप भयानक होती. वासाहातिक कालखंडात ती सर्वात प्रथम जाणवली ती राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुलेंना.

त्यांनी त्याविरोधात जो क्रांतीचा अंगार फुलवला, त्याच्या ज्वालांच्या उजेडात वर्ण-जातीव्यवस्थेने पिचलेले असंख्य शूद्रातिशूद्र मानव, त्यांचा आक्रोश दिसून आला. व तो ऐवढा भयावह होता की, त्याविरुध्द जोतीराव फुलेंना रान उठवणे हे "जीवनाचे आद्य कर्तव्य" वाटले व ते त्यांनी साऱ्या विश्वाविरुध्द उभे राहुन ते तडीस नेले..! हा इतिहास सर्वज्ञात आहे.

महात्मा फुलेंनी त्याविरुध्द लेखणी उचलली व या गावकुसाबाहेरच्या सतत परांगदा व स्थलांतर होणाऱ्या भिल्ल, रामोशी, फासे पारधी, धनगर, महार, मांग या लोकांना पोटाशी धरले. त्यांच्या सतत होणाऱ्या स्थलांतरीत जीवनातून मुक्ती मिळवण्यासाठी, प्रबोधन, शिक्षण, शाळा व कामधंदा याची नीट मांडणी केली.

त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना आपल्या आसपास ठेवले व स्थिर जीवनाचे आश्वासन दिले. येथे स्थलांतरातून पहिले स्थित्यंतर घडून आले होते. अमानविय जीवन जगणाऱ्या या समुहांना माणूस म्हणून पहिल्यांदा ओळख मिळाली होती.

महात्मा फुले थांबले नाहीत. त्यांनी तरण्याबांड मुलांना खेडी सोडून मुंबई, ठाणे, पनवेलचा रस्ता दाखवला. कारण इकडे मुंबईची उभारणी होत होती व सत्यशोधकांचीही कार्यशाळा भरवली जात होती. ब्रिटीश आल्यावर त्यांना खडे सैन्याची गरज भासली.

त्यापूर्वी राजेशाही कालखंडात ' गावात भुखेने मरण्यापेक्षा सैन्यात लढून मरु!' हा गरीबीवर जालीम उपाय समजला जाई. त्यामुळे धनगर मेंढरामागे फिरत, वंजारी घोडे आणि खेचरांमागे फिरत तर बाकीचे शाहू, कुणबी, मराठा, महार सैन्यात भरती होत असत.

अस्पृश्यांना जंगलात रहायची व पळून जायची परवाणगी नव्हती. पेशवाई अवतरल्यावर त्यांच्यावर जुलूम, जबरदस्ती व दुःखाचा डोंगर लादण्यात आला होता. वर उल्लेख केलेल्या हालाखीला धरबंध नव्हता.

या भयावह पार्श्वभूमीवर ब्रिटिशांचे राज्य त्यांना देवाचे वरदाण वाटले तर नवल नव्हते ! पुढे इस्ट इंडिया कंपनीचे सरकार आल्यावर यात बादल झाला. इंग्रजांना सन १७६५ पासून किंवा सन १८१८ पासून पेशव्यांकडून राज्य घेतल्यानंतर या भागात जबाबदार राज्य निर्माण करायचे होते.

त्यासाठी एलफिस्टनने ब्रिटीश राज्याची उभारणी खालील शिस्तीच्या आधारावर केली. शांतता व सुव्यवस्था निर्माण करणे .त्यासाठी खडे सैन्य व पोलीसदल उभारणे. प्रजेच्या जान-मालचे रक्षण करणे, त्यांना शिक्षित करणे व आनंदी ठेवणे हे कार्य त्यांनी आपले उत्तरदायित्व समजून केले.

ब्रिटीशांनी खडे सैन्य उभारणे सुरु केल्यामुळे, गावातील जातीव्यवस्थेच्या जाचातून मुक्त होणाऱ्या तरुणांनी मुंबई-ठाणेच्या दिशेने स्थलांतर करणे सुरु केले होते. महात्मा जोतीराव फुलेंनी मुंबई व ठाणे जिल्ह्यात त्यांच्या "दी पुणे कमर्शियल अँड काँट्रक्टींग कंपनी" या कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत बिल्डिंग,

ब्रीज व डॕम बांधण्याचे मोठामोठे सरकारी कामे घेऊन तेथे मोठ्या प्रमाणावर अस्पृश्य लोकांना रोजगार पुरवला होता. येथे या मजूरांना समता व सन्मानाची वागणूक मिळत असल्याने त्यांनी मुंबई-ठाण्यामध्ये स्थायी स्वरुपात स्थायिक होण्याचा पर्याय निवडला होता. त्यामुळे स्पृश्य-अस्पृश्य स्थलांतरीतांना स्थायिक होण्याची नामी संधी उपलब्ध झाली होती व ती त्यांनी पुरेपूर साधली होती.

मुंबई व ठाणे हे मुंब्र्याच्या खाडीच्या पलीकडे असल्याने मुख्य भूमीपासून अलग राहिल्याने येथे पेशवाई अवतरली नाही. म्हणून त्यांनी मिश्र संस्कृतीचा वारसा उचलला होता. इंग्रज गर्व्हनरने सांगितल्यानुसार मुंबई-ठाण्यात आलेला प्रत्येक स्थलांतरीत समाज आपापली नेमून दिलेली कामे करीत होता. मुंबईत सात खाड्या बुजवून जसे महानगर बनत होते, तसे ठाणेही घडत होते."

ठाणे म्युन्सिपालिटीचा इतिहास "यात ठाण्याचे 'घडण्याचे' सविस्तर वर्णन पहायला मिळते. मुंब्र्याच्या खाडीवर ब्रिटिशांनी एक फलक लावला होता. "खबरदार , तुम्ही आरबी समुद्र पार करीत आहात !" पर्यायाने पुण्याचे पांढरपेशे लोक कल्याण डोंबिवलीच्या पुढे गेलेच नाहीत. सीकेपी मात्र दादर-गिरगांव पर्यंत पोहचले होते.

त्यामुळे मुंबई -ठाण्यात मध्यमवर्ग असा नव्हताच .म्हणून ब्रिटिशांनी आणलेल्या लोकशाहीमुळे मुंबई-ठाण्याचे लोक प्रतिनिधी सारे कामगार व कष्टकरी वर्गातून बनले होते. मुंबई -ठाण्यात कामगार नेते लोकप्रतिनीधी झालेत ,तरीपण मुंबई-ठाण्याचे प्रश्न सुटले नाहीत.कारण मुंबई -ठाण्यावर वर्चस्व मात्र या मराठी माणसांचे कधीच राहीले नाही.

मुंबई व नंतर ठाण्यातले कष्टकरी हे सुरवातीला घाटी व कोकणी कामगार होते . पुढे दक्षिणेत आण्णा दुराईचे राज्य आल्यावर राबणारे हात मुंबई+-ठाण्यात मद्रास केरळमधून येवू लागले. पुढे मध्यपुर्वेला-दुबई-गल्फदेशांमध्ये काम मिळू लागल्यावर केरळी-मद्रासी तिकडे गेले व त्यांची जागा उत्तर प्रदेश बिहारच्या कामगारांनी घेतली.

या राबणाऱ्या हातांचे महत्व इंग्रजांनी ओळखले होते.म्हणून त्यांनी जिथे जिथे वसाहती उभारल्या तेथे तेथे या भारतीय शूद्र-अतिशूद्र हातांना तिकडे नेले. या राबाणाऱ्या हातांनी फिजी, इंडोचायना, श्रीलंका, मॕरीशस, त्रिनीनाद, गयाना, वेस्टइंडिज आदी ठिकाणी ब्रिटिशांच्या वसाहती फुलवल्या . आज ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य इकडच्याप्रमाणे तिकडेही मावळला आहे.

मात्र त्यांच्या काॕलनीज् मधून सर्वत्र भारतीय लोक प्रतिनीधींची सरकारे आहेत. तेथून तिकडे गेलेल्या भारतीय कष्टकऱ्यांचे वंशज तेथे मुख्यप्रधान आहेत.पंतप्रधान आहेत.देशाच्या सर्वाच्च स्थानावर पोहचून त्या वसाहती सुखाने चालवत आहेत. मात्र, आपल्याकडे भारतात तसे झाले नाही. येथील कष्टकऱ्यांना धडपणे उभे राहू दिले गेले, धडपणे काम करु दिले नाही. यांच्या ऊर्मींवर पाणी फिरवलं. सतत यांना घर-दार,नोकरी, पोटापाण्याच्या झगाड्यात अडकवून ठेवलं.

भारतीय वर्ण-जातिव्यवस्थेचे किती भयानक वास्तव आहे.! तिकडे ब्रिटिशांच्या काॕलनीत याच भारतीय कष्टकरी वंशजांची सर्वौच्च सरकारे अस्तित्वात आलीत.मात्र येथे सर्व भारतभर असे घडते नाही ! क्षणभर एक विचार मनात डोकावून गेला....." या भारतातील कष्टकऱ्यांच्या वसाहती फिजी, गायाना , मॉरिशसमध्ये असत्या तर ?...

तर..,या वसाहतीतील लोकांचे जीवन सोन्यासारखे झाले असते. त्याच्यातील कितीतरी जण राज्यकारभारात सामील झाले असते.. आणि आपल्या जन्मभुमीचे नाव रोशन केले असते...थोडक्यात त्यांच्या गुणाची आणि श्रमाची कदर झाली असती..!

परंतु आपला हा भारत आहे. हा वर्णव्यवस्थाक, जातिप्रधान देश आहे.येथे मुल्य श्रमाला नाही, तर जातीला आहे! म्हणून आपल्याकडे किती तरी साॕक्रेटिस ,राॕजर बेकन, प्लेटो तयार झाले. कितीतरी कार्व्हाव, सिकंदर, जाॕन हस तयार झाले, परंतु इथल्या जातीने त्यांना जातीचीच नावे दिली. त्यांचे श्रेय हिरावून घेतले. ही आमच्या बुद्धिजीवीची विटंबना आहे.

तीच गती व स्थिती या वसाहतील कष्टकऱ्यांची आहे. तिने स्थलांतरातून स्थित्यंतर घडवून तर आणले खरे, परंतु ही जातिव्यवस्था येथील कष्टकऱ्यांच्या स्थित्यंतराला चिराऊ होऊ देत नाही! कायम त्यांनी विवंचनेत ठेवते !. या स्थलांतराची विवंचना अजुनही सुरूच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com