महावितरणची पुनर्रचना गैरसोईची

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

चिखली - महावितरणच्या पुनर्रचनेत मोशी-चिखली शाखा कार्यालयाचा परिसर आकुर्डी ऐवजी (थरमॅक्‍स चौक) भोसरी उपविभागीय कार्यालयास जोडला जाणार आहे. त्यामुळे  मोशी, चिखली परिसरातील ग्राहकांना वीजजोड, बिल दुरुस्ती आदी कामांसाठी भोसरी येथे जावे लागणार आहे. भौगोलिकदृष्ट्या भोसरी उपविभागीय कार्यालय आकुर्डी उपविभागीय कार्यालयापेक्षा सात ते आठ कि.मी. लांब असल्यानेही ग्राहकांच्या दृष्टीने ते अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे मोशी-चिखली कार्यालय भोसरी उपविभागीय कार्यालयाला जोडण्यास नागरिकांचा तीव्र विरोध आहे.

चिखली - महावितरणच्या पुनर्रचनेत मोशी-चिखली शाखा कार्यालयाचा परिसर आकुर्डी ऐवजी (थरमॅक्‍स चौक) भोसरी उपविभागीय कार्यालयास जोडला जाणार आहे. त्यामुळे  मोशी, चिखली परिसरातील ग्राहकांना वीजजोड, बिल दुरुस्ती आदी कामांसाठी भोसरी येथे जावे लागणार आहे. भौगोलिकदृष्ट्या भोसरी उपविभागीय कार्यालय आकुर्डी उपविभागीय कार्यालयापेक्षा सात ते आठ कि.मी. लांब असल्यानेही ग्राहकांच्या दृष्टीने ते अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे मोशी-चिखली कार्यालय भोसरी उपविभागीय कार्यालयाला जोडण्यास नागरिकांचा तीव्र विरोध आहे.

महावितरणच्या भोसरी कार्यालयांतर्गत निगडी प्राधिकरण, आकुर्डी (थरमॅक्‍स चौक), भोसरी १ आणि २ अशी चार उपविभागीय कार्यालये आहेत. सध्या प्रत्येक कार्यालयामार्फत ठरवून दिलेल्या भागातील वीजजोड आणि वीज दुरुस्ती संबंधीची कामे केली जातात. नव्या पुनर्रचनेनुसार निगडी प्राधिकरण आणि भोसरी १ या कार्यालयांतून वीजजोड आणि बिले देण्याची कामे करण्यात येणार आहेत. तर, आकुर्डी (थरमॅक्‍स चौक) आणि भोसरी २ या कार्यालयांद्वारे निगा आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. आकुर्डी उपविभागीय कार्यालयांतर्गत येणारा चिखली, मोशी, चऱ्होली हा भाग भोसरी कार्यालयाला जोडला जाणार असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना वीजजोड, बिल दुरुस्ती किंवा वीजपुरवठा यासंबंधी कोणतेही काम असल्यास भोसरी कार्यालयात जावे लागणार आहे. भौगोलिकदृष्ट्या आकुर्डीपेक्षा चिखली, मोशी ते भोसरी हे अंतर अधिक आहे. त्यासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. 

या पुनर्रचनेबाबत नागरिकांच्या हरकती, सूचनाही मागविण्यात आलेल्या नाहीत. महावितरणच्या कामकाजाचा अनुभव पाहता एकदा जाऊन काम होत नाही. हेलपाटे मारावे लागतील. त्याचा त्रास सहन करावा लागणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.  सध्या थरमॅक्‍स चौक (आकुर्डी) येथील कार्यालयात पायी जाऊन कामे करून घेता येऊ शकत होती. भोसरी ते चिखली हे अंतर आठ ते दहा कि.मी. आहे. नागरिकांना कामासाठी वारंवार हेलपाटे मारणे परवडणारे नाही. त्यामुळे चिखली, मोशी परिसर भोसरी उपविभागीय कार्यालयाला जोडण्यास आमचा विरोध आहे. त्यासाठी ऊर्जामंत्री, महावितरण आयुक्त, अधीक्षक अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे, असे महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सांगितले.

चिखली, मोशी परिसर भोसरी उपविभागीय कार्यालयाला जोडला गेल्यास उद्योजकांच्या अडचणी वाढणार आहेत. अचानक वीजप्रवाह खंडित होतो. अंतर जास्त असल्याने दुरुस्तीसाठी विलंब लागू शकतो. पर्यायाने कामगार बसून राहतील. त्याचा आर्थिक फटका उद्योजकांना बसण्याची शक्‍यता पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे यांनी व्यक्त केली.

चिखली, मोशी भाग भोसरीला जोडण्याचा निर्णय अयोग्य आहे. छोट्या कामासाठी दिवस वाया घालावा लागेल. वेळेबरोबरच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागेल. 
- कांतिलाल साने, बाळासाहेब मोरे, नागरिक

महावितरणची पुनर्रचना राज्यभर - राऊत
महावितरणची पुनर्रचना संपूर्ण राज्यभर करण्यात येणार आहे. तो विषय फक्त भोसरी कार्यालयापुरता मर्यादित नाही. तूर्त हा विषय थांबविण्यात आला आहे, असे महावितरणचे माहिती अधिकारी निशिकांत राऊत यांनी सांगितले.

Web Title: Mahavitaran Restructure Issue