'पुणेकरांची आयुक्तांकडून दिशाभूल'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादर केलेल्या प्रारूप अर्थसंकल्पावर बोट ठेवले. अशा प्रकारे दिशाभूल करणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत पुणेकरांनी आयुक्तांना जाब विचारायला हवाच, असे झगडे यांनी सांगितले. 

पुणे - पुणेकरांना कोणत्या सुविधा हव्यात? त्यासाठी कोठून आणि किती उत्पन्न मिळेल? त्यातून नेमकी कोणती कामे हाती घ्यायवची आणि ती पूर्ण करायची? याचा ताळमेळ न घालताच महापालिका आयुक्तांनी मांडलेला अर्थसंकल्प हा "फाजीलपणा' आहे, अशा शब्दांत माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादर केलेल्या प्रारूप अर्थसंकल्पावर बोट ठेवले. अशा प्रकारे दिशाभूल करणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत पुणेकरांनी आयुक्तांना जाब विचारायला हवाच, असे झगडे यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या विकासाची दिशा ठरविणारा सुमारे 6 हजार 229 कोटी रुपयांचा प्रारूप अर्थसंकल्प 2020-21 गायकवाड यांनी स्थायी समितीकडे सोपविला. त्यावर सजग नागरिक मंचातर्फे चर्चेचे आयोजन करण्यात आले. तेव्हा झगडे यांनी अर्थसंकल्पातील योजना, त्यासाठीचे उत्पन्न आणि त्याची अंमलबजावणी या बाबींवर आक्षेप घेतले. मंचचे विवेक वेलणकर, जुगल राठी उपस्थित होते. 

झगडे म्हणाले, ""अर्थसंकल्प तयार करण्याची नियमावली आहे. तिच्यानुसार त्याची मांडणी अपेक्षित आहे. मात्र, ती न पाहता, न वाचताच अर्थसंकल्प करण्यात येतात. त्यामुळे त्याच्या मूळ उद्देशाला धक्का बसतो. पुणे महापालिकेतील आयुक्तही त्याच पद्धतीने अर्थसंकल्प जाहीर करतात. या वर्षीचा म्हणजे, 2019-20 अर्थसंकल्प हा पोरखेळ होता; त्यात थोडासा बदल करून पुढील वर्षीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. योजना पूर्ण करण्याचे बंधन असते; पण त्याचा कुठेच विचार होत नाही. महापालिकेतील जबाबदार अधिकाऱ्यांकडे अर्थसंकल्पाची साक्षरता नसल्यानेच हे घडत आहे.'' 

शहरातील वाहतूक, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधा सोडविण्याची गरज असते; त्यासाठीच उदासीनता दाखवून अर्थसंकल्पात दिखाऊपणा केला जात आहे. 
- महेश झगडे, माजी सनदी अधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahesh Zagade criticizes Municipal Budget