पुण्यात दिवसभर नद्यांसोबत ट्रॅफिकचाही पूर!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

नद्यांना मोठ्या प्रमाणात आलेल्या पाण्यामुळे सोमवारी पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरामधील काही पुल वाहतुकीसाठी बंद केल्याने पर्यायी बोपोडी व बालेवाडी येथील पुलांवर सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. तर शहरात भिडे पुल व टिळक पुल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे दुसऱ्या आठवड्यातही शहरातील वाहतूक कोंडी कायम राहिली

पुणे : नद्यांना मोठ्या प्रमाणात आलेल्या पाण्यामुळे सोमवारी पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरामधील काही पुल वाहतुकीसाठी बंद केल्याने पर्यायी बोपोडी व बालेवाडी येथील पुलांवर सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. तर शहरात भिडे पुल व टिळक पुल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे दुसऱ्या आठवड्यातही शहरातील वाहतूक कोंडी कायम राहिली

मुळा नदीची पाणी पातळी वाढल्याने बोपोडी ते पिंपळे-निलख या दरम्यानच्या पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांना जोडणाऱ्या चार ते पाच पुल वाहतुकीसाठी सोमवारी सकाळपासून बंद ठेवण्यात आले. नऊ ते दहा वाजल्यापासून वाहने पुलांजवळ आल्यानंतर त्यांना पुल बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वाहनचालकांनी पर्यायी मार्ग शोधण्यास सुरूवात केली. त्यामुळे बहुतांश वाहनांची गर्दी बोपोडी व बालेवाडी येथील पुलाकडे वळली. त्यामुळे या दोन्ही पुलांवर वाहतुक कोंडी होऊन वाहने संथ गतीने पुढे जात होती. हे चित्र दुपारी बदलून दोन्ही पुलांवरील वाहतुक सुरळीत झाली. त्याचवेळी कोथरुड, चांदणी चौक, वारजे माळवाडी, कर्वेनगर येथून पुण्यात जाणाऱ्या वाहनांना नळस्टॉप, म्हात्रे पुल, कर्वे रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता या ठिकाणांवर सकाळी वाहतुक संथगतीने सुरू होती.

दरम्यान, भिडे पुल व टिळक पुल बंद असल्यामुळे सायंकाळी पुन्हा मध्यवर्ती भागामधील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर वाहनांची गर्दी होण्यास सुरूवात झाली. बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, सदाशिव पेठ, नारायण पेठ, नवी पेठ, डेक्कन, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, कर्वे रस्त्यावर वाहतु कोंडी कायम होती. तर दुसरीकडे औंध परिसरातील चार ते पाच पुल बंद असल्यामुळे पुण्याहून पिंपरी-चिंचवडकडे जाणारी व हिंजवडी, पिंपरी-चिंचवडहून पुण्यात येणाऱ्या वाहने पुन्हा बालेवाडी येथे आणि बोपोडी येथील पुलावर आल्यामुळे वाहतूक कोंडी सुरू झाली. वाहनांच्या दूरपयर्यंत रांगा लागल्या. काही मिनीटांच्या अंतरावर जाण्यासाठी नागरीकांना वाहतुक कोंडीमध्ये एक ते दिड तास वाया घालवाला लागल्याचे चित्र सोमवारी सायंकाळी होते. रात्री दहा वाजल्यानंतर मध्यवर्ती भागासह बालेवाडी, बोपोडी येथील वाहतूक सुरळीत झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: major Traffic Jam in heavy Rainfall in Pune