हलव्याचे दागिने अन्‌ पिस्ता, मँगो, तिळवडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

पुणे - मकर संक्रांत... नववधूचा पहिलाच सण... अवघ्या चार दिवसांवर सण आल्याने हलव्याच्या दागिन्यांच्या खरेदीचा आनंद नागरिक घेत आहेत. नववधूसाठी हलव्याच्या दागिन्यांचा सेट, बाळाकरिता श्रीकृष्ण सेट आणि जावयाकरिताही आकर्षक दागिने बाजारपेठेत आले आहेत. श्रीकृष्ण सेटमध्ये मोरपिसाचा मुकुट, बासरी, हलव्याचा हार, बोरन्हाणाचे साहित्य आहे. जावयाला द्यायला हत्तीच्या अंबारीवरील वाटीत काजू, खडीसाखर, वेलदोडा, बडीशेप, शेंगदाणा, हरभराडाळीवरचा हलवाही आला आहे.

सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो, त्या तिथीला मकर संक्रांत साजरी केली जाते. यंदा १३ जानेवारी भोगी, १४ ला संक्रांत आणि १५ ला किंक्रांत आली आहे. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत बाळाचे बोरन्हाणे करतात. तर संक्रांतीला नववधू, जावयाला बोलावून गोडाधोडाचे जेवण आणि हलव्याच्या दागिन्यांनी त्यांना सजविण्याची परंपरा आहे.

विक्रेते शरद गंजीवाले म्हणाले, ‘‘सामाजिक अभिसरणाचे सण, ही मकर संक्रांतीची ओळख. मोठ्यांनी लहानग्यांना तिळगूळ द्यायचा, ही आपली पद्धत. परदेशांत स्थायिक झालेल्या मराठी भाषिकांकडूनही हलव्याचे दागिने, तिळाच्या वड्या आणि हलव्याला मोठी मागणी असते. बाजारात गजरा, पैंजण, चंद्रिका सेट, पाटल्या आदी हलव्याचे नानाविध दागिने आले आहेत.’’

विक्रेते प्रभाकर ढेंबे म्हणाले, ‘‘दिवाळीनंतर तिळवडी, लाडू, हलवा तयार करण्यास सुरवात करतो. पिस्ता, मॅंगो, स्ट्रॉबेरीयुक्त तिळवडीलाही ग्राहकांची पसंती मिळत आहे.

हलव्याच्या दागिन्यांचे आकर्षण
महिलावर्गाला हलव्याच्या दागिन्यांचे विशेष आकर्षण असून, बाजारात साडेतीनशे ते पाचशे रुपयांमध्ये दागिन्यांचे सेट उपलब्ध आहेत. मुकुट, मणी-मंगळसूत्र, तन्मणी, नेकलेस, बिंदी, बाजूबंद, कंबरपट्टा, पाटल्या, बांगड्या, नारळ, हार, पुष्पगुच्छ आणि हलव्याचा मोबाईल बाजारात आला आहे. पिस्ता, मॅंगो, स्ट्रॉबेरी चवीच्या तिळगुळाच्या वड्यांनी भाव खाल्ला असून, काटेरी हलवाही बाजारात आला आहे.

Web Title: makar sankrant purchasing