"मेक इन'ऐवजी "थिंक इन इंडिया'ची गरज 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

पुणे - ""जगाच्या तांत्रिक संशोधनात भारतीय शास्त्रज्ञांचा वाटा केवळ पाच टक्के आहे. संशोधनातील आपली पीछेहाट हा स्पर्धात्मक जगात टिकून राहण्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. विद्यापीठांनी याचा बोध घेऊन विद्यार्थ्यांमध्ये गांभीर्याने शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे. त्याबरोबरच भारतात "मेक इन' वा "मेड इन इंडिया'ऐवजी आधी "थिंक इन इंडिया' मोहीम सुरू करण्याची गरज आहे,'' असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. 

भारती विद्यापीठ विश्‍वविद्यालयाने अठराव्या पदवी प्रदान समारंभात पवार यांना डी. लिट. पदवी देऊन सन्मानित केले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी साडेसहा हजार विद्यार्थ्यांना पदवी, 32 जणांना सुवर्णपदके आणि 93 विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. या वेळी विश्‍वविद्यालयाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्‍वजित कदम, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा नियंत्रक डॉ. विश्‍वास धाप्ते आदी उपस्थित होते. 

गुणवत्ता सुधारा 
राष्ट्रीय मानांकनात देशातील विद्यापीठांना स्थान मिळत असले, तरी त्यांनी संख्यात्मक वाढीबरोबरच गुणात्मक वाढीकडे तेवढे लक्ष दिलेले दिसत नाही. शांघाय रॅंकिंग या नावाने विद्यापीठांचे मूल्यांकन नुकतेच जाहीर झाले. त्यामध्ये जगातील गुणवत्ताधारक 500 विद्यापीठांमध्ये 137 अमेरिकी, 54 चिनी आणि भारतातील केवळ एकच विद्यापीठ आहे. त्यामुळे भारतातील सर्व सरकारी, खासगी विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणात्मक सुधारणेसाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन पवार यांनी केले. 

बहुतांशी विद्यार्थ्यांचा कल विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखांकडे वळण्याचा असतो. याबद्दल चिंता व्यक्त करताना पवार म्हणाले, ""मुक्त कला शिक्षणाकडे विद्यार्थी निरुत्साही नजरेने बघतात. मुक्तकला, समाजशिक्षण, मानवशिक्षण हे विषय मागे पडतात. आपल्या देशाला सी. व्ही. रमण, डॉ. होमी भाभा, डॉ. कलाम तर हवेतच पण त्याचबरोबर संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम आणि विवेकानंद हेदेखील नव्या पिढीतून तयार झाले पाहिजेत.'' 

विद्यापीठांत एकात्मता राखावी 
शरद पवार यांनी देशातील विद्यापीठांमधील असंतोषाच्या वातावरणावरही भाष्य केले. ""देशातील विद्यापीठांत आंदोलनाचे प्रकार वारंवार पाहायला मिळतात. हे जिवंत लोकशाहीचे द्योतक असले, तरी अशा आंदोलनांमध्ये लोकशाही मूल्ये तुडविली जातील, लोकशाहीवर संकट येईल, अशी पावले उचलली जाऊ नयेत. भारत हा अठरापगड जातींचा, विविध भाषा-धर्म, संस्कृतीचा, वैविध्यपूर्ण प्रांताचा देश आहे. आपण विविधतेत एकता आणि सहिष्णुता या सूत्रांनी देशातील एकात्मता अबाधित राखली पाहिजे.''

Web Title: Make in rather Think in India need