Pune Rain : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती!

Pune_Rain
Pune_Rain

पुणे : रात्रीच्या दहा वाजत आल्या होत्या, अर्धातासापूर्वीच जेवण करून हॉल मध्ये बसले होते. बाहेर पावसाचा प्रचंड जोर होता. आम्ही सर्व झोपण्याच्या तयारीतच होतो. बाहेरून मात्र ओढ्याचा खळखळाट जोरात ऐकू येत होता. नाही म्हटलं तरी गेल्यावर्षीची ती भयानक रात्र डोळ्यासमोर येत होती. तितक्यात पाण्याची लाट खिडकीच्या काचा तोडून जोरात घरात थडकली. काय करावे समजेना, दोन मिनिटात तर माझ्या नाका तोंडापर्यंत पाणी आले. बस काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती, अशा भावना मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेल्या मालती भिसे यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केल्या.

गेली दोन दिवस शहरात पावसाने जोर धरला आहे. मात्र, बुधवारी (ता.१४) सायंकाळी सात वाजल्यापासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणी पाणी झाले. सहकारनगरमधील चव्हाननगर भागातील नटराज सोसायटीमध्ये भिसे कुटुंब राहते. भिसे यांच्या घरात गेल्या वर्षी अशाच प्रकारे सोसायटीच्या पाठीमागे आंबील ओढ्यालगत बांधलेली भिंत पडून पाणी घरात घुसले होते. त्यावेळीही घरातील वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले होते.

त्याचीच यावर्षीही पुनरावृत्ती होऊन सोसायटीच्या रहिवाशांनी स्वखर्चाने बांधलेली भिंत पडून प्रचंड वेगाने घरात पाणी शिरले. पाण्याचा इतका वेग होता की, एका मिनिटाच्या आताच माझ्या नाका-तोंडात पाणी जात होते. मुलीला मी उचलून धरले होते. पती मदतीसाठी ओरडत होते. पाण्याचा दाब प्रचंड असल्याने बाहेर जाणारा दरवाजा उघडता येत नव्हता. आता आम्ही बुडतोय की काय असे वाटत असतानाच सोसायटीमधील इतर नागरिकांनी लोखंडाच्या पहारेने दरवाजा तोडला आणि मी, मुलगी, पती बाहेर पडलो.

'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती,' असाच प्रकार आमच्यासोबत घडला. घरातील वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरातील एकही वस्तू जागेवर राहिलेली नाही. आम्ही थोडक्यात बचावलो. प्रशासनाने लवकरात लवकर ओढ्यालगतची भिंत बांधावी आणि आम्हाला दरवर्षीच्या मृत्यूच्या भयातून मुक्त करावे, अशी मागणी भिसे कुटुंबियांनी केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com