दोन पोलिस निलंबित; 'मोक्का'तील आरोपी बडतर्फ पोलिस जगतापला करत होते मदत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

जगतापने 11 ऑक्‍टोबरपासून रूग्णालयातच उपोषण सुरू केले होते. त्यावेळी बंडगार्डन पोलिस ठाण्याअंतर्गतच्या पुणे स्टेशन पोलिस चौकीमध्ये नियुक्तीस असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे आणि त्यांच्या पथकाला जगतापचे समुपदेशन करण्यास सांगण्यात आले होते.

पुणे : महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई झालेला आरोपी आणि बडतर्फ पोलिस शैलेश जगताप यास ससून रुग्णालयात उपोषण करीत असताना मदत केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकास अजून एका पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांनी जगतापच्या उपोषणाची अनावश्‍यकरीत्या स्टेशन डायरीमध्ये नोंद करुन गोपनीय माहिती व्हॉटस्‌अपद्वारे प्रसारीत केली होती. चौकशीनंतर अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी ही कारवाई केली. 

भारताला पहिला 'ऑस्कर' मिळवून देणाऱ्या कॉस्च्युम डिझायनर भानू अथैया यांचे निधन​

सहायक पोलीस निरीक्षक निलेश सुरेश घोरपडे आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश ईश्‍वर कांबळे असे निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत. जगताप याच्यावर शहरातील विविध पोलिस ठाण्यात खंडणी, फसवणुकीसह विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी जगताप याच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू असल्याने तो न्यायालयीन कोठडीत आहे.

दरम्यान, जगतापने 11 ऑक्‍टोबरपासून रूग्णालयातच उपोषण सुरू केले होते. त्यावेळी बंडगार्डन पोलिस ठाण्याअंतर्गतच्या पुणे स्टेशन पोलिस चौकीमध्ये नियुक्तीस असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे आणि त्यांच्या पथकाला जगतापचे समुपदेशन करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार घोरपडे ससून रुग्णालयात गेले. त्यावेळी रास्ता पेठेतील जागेचा ताबा घेण्यासाठी आपल्यावर मोक्‍काचा गुन्हा दाखल करून दबाव आणला जात असल्याने आपण उपोषण करीत असल्याचे जगतापने घोरपडे यांना सांगितले. मात्र, कर्तव्यावर असतानाही घोरपडे यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली नाही.

घराचं स्वप्न पूर्ण करण्याकडं खरेदीदारांचा मोर्चा; विक्रीत झाली मोठी वाढ!

याउलट त्यांनी अनावश्‍यकरित्या स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्याचा अहवाल दिला. तर सहायक पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी संबंधित अहवाल बऱ्याच व्हॉट्‌सऍप ग्रुपवर प्रसारित केला. त्यामुळे शासकीय गोपनियेता भंग झाल्याचा आणि पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका दोघांवर ठेवण्यात आला आहे. तसेच आरोपीला मदत केल्याचा ठपका ठेऊन दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सध्या दोघांचीही बदली पोलिस मुख्यालयात केली असून पोलिस उपायुक्तांच्या परवानगीशिवाय शहराबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली असल्याचे डॉ. शिंदे यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two policemen from Bundgarden police station have been suspended for helping Shailesh Jagtap