खटकेवस्तीत उभे राहतेय मानवनिर्मित जंगल !

ज्ञानेश्वर रायते :  सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 26 जुलै 2019

दोन वर्षांपूर्वी ज्या जमिनीवर काळ्याकभिन्न दगडांखेरीज काहीच नव्हते, तिथे आता वनराई फुललीच आहे. फुलपाखरांपासून ते मुंग्यांच्या वारुळापर्यंत सारी जैवविविधता येथे फुलली आहे.

बारामती (पुणे) :  दोन वर्षांपूर्वी ज्या जमिनीवर काळ्याकभिन्न दगडांखेरीज काहीच नव्हते, तिथे आता वनराई फुललीच आहे. फुलपाखरांपासून ते मुंग्यांच्या वारुळापर्यंत सारी जैवविविधता येथे फुलली आहे. बारामती तालुक्‍याच्या हद्दीपासून तीन किलोमीटर अंतरावर खटकेवस्ती (ता. फलटण) येथे गावकरी तीन वर्षांपासून नियोजनबद्धरीत्या मानवनिर्मित "जंगल' उभे करीत आहेत. 

यंदाच्या उन्हाळ्याने फक्त दुष्काळाची दाहकता वाढवली नाही, तर वाढत्या तापमानाने हैराणही केले. यावर उतारा म्हणून झाडे लावण्याची घोषणा प्रत्येकाच्या तोंडी आली. माणसांच्याच चुकीमुळे निसर्गाचे वाटोळे झाले आणि ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसल्याची चर्चा आपण नेहमीच ऐकतो. खटकेवस्ती गावात वन विभागाच्या जागेत ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेले काम आदर्शवत आहे. डॉ. विकास खटके (गोखळी, ता. बारामती), बारामतीतील डॉ. महेश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. 
 
"सह्याद्री देवराई' 
खटकेवस्ती गावात शासकीय अधिकारी श्रीकांत खटके, डॉ. विकास खटके व त्यांच्या सहकाऱ्यांच्या योगदानातून "सह्याद्री देवराई' उभी राहत आहे. 55 एकर वन विभागाच्या क्षेत्रात 12 एकरांत आतापर्यंत दीड हजार झाडांचे जंगल उभारले आहे. गावकऱ्यांनी उत्साहाने काम केले. 10 ते 12 कार्यकर्ते सध्या स्वयंस्फूर्तीने हे काम करीत आहेत. सन 2016 पासून हे काम सुरू आहे. वनविभागाने सहकार्य केले. 

टॅंकरने, तर कधी ठिबकने जगविली झाडे 
कधी कधी टॅंकरने पाणी आणून झाडे जगवली गेली. गावच्या पाण्याच्या टाकीतून ठिबकने पाणी देऊन गावकऱ्यांनी ही झाडे जगवली. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक खर्च आला आहे. ग्रामस्थ आनंदाने श्रमदान करतात. येथे कुऱ्हाडबंदी, चराईबंदी करण्यात आली आहे. वड, पिंपळ, लिंब जांभळापासून ते देशी बाभळीपर्यंत झाडे येथे जोपासली गेली आहेत. येत्या काळात येथे माणसांनी उभारलेले जंगल उठून दिसेल. वनविभाग आणि बारामतीकरांच्या मार्गदर्शनातून हे काम सुरू आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man-made jungle is standing