'अण्णा-शेवंता'चा फोटो पाठवून महिला होमगार्डला म्हणाला, प्रेमाला वय नसते

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

उत्तम शिवाजी साळवी (रा. उत्तमनगर) असे अटक केलेल्या शहर समादेशकाचे नाव आहे. याप्रकरणी 28 वर्षीय महिला होमगार्डने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार मार्च ते नोव्हेंबर 2019 या कालावधीमध्ये घडला आहे.

पुणे : "रात्रीस खेळ चाले' या दूरचित्रवाणी मालिकेतील अण्णा नाईक व शेवंता या जोडीच्या एकमेकांच्या मिठीतील फोटोसह "प्रेमाला वय नसते' असे मेसेज महिला होमगार्डला पाठविणाऱ्या शहर समादेशकाला चांगलीच अद्दल घडली आहे. अण्णा-शेवंताच्या "त्या' फोटोमुळे विनयभंग झाल्याची पोलिसांकडे केली, पोलिसांनीही त्याची गांभीर्याने दखल घेत शहर समादेशकाला बेड्या ठोकल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उत्तम शिवाजी साळवी (रा. उत्तमनगर) असे अटक केलेल्या शहर समादेशकाचे नाव आहे. याप्रकरणी 28 वर्षीय महिला होमगार्डने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार मार्च ते नोव्हेंबर 2019 या कालावधीमध्ये घडला आहे. साळवी हा होमर्गाडचा शहर समादेशक आहे. त्याने फिर्यादी यांच्याशी जवळीक साधण्यासाठी व्हाटस्‌अपद्वारे मेसेज पाठवित होता. दरम्यान, त्याने फिर्यादी यांच्या मोबाईलवर "रात्रीस खेळ चाले' या दूरचित्रवाणी मालिकेतील नायक अण्णा नाईक व नायिका शेवंता यांचे एकमेकांच्या मिठीत असलेले फोटो पाठवित होता. संबंधित फोटोसमवेत "प्रेमाला वय नसते' असे मेसेज पाठवित होता. याबरोबरच फिर्यादीकडे वाईट नजरेने पाहून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे साळवी बोलत असे. त्याचबरोबर माझ्या सांगण्याप्रमाणे वागली नाहीस, तर कामावरुन कमी करण्याची धमकीही देत होता. 

दरम्यान, फिर्यादी यांनी ग्रामीण पोलिस दलाकडे याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांच्याकडून बिबवेवाडी पोलिस ठाण्याकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले. तर बिबवेवाडी पोलिसांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे वर्ग केला. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून समादेशकाला अटक केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A man proposes a lady home guard by sending a photo of Ratris Khel Chale fame Anna Shewanta